भंडाऱ्यात आणखी एका नवजात बाळाचा सौदा उघड.
सोमवार, 23 फ़रवरी 2026
Comment
• 4 लाख 70 हजारांत नवजाताचा व्यवहार,डॉ. नितेश वाजपेयी पुन्हा जाळ्यात
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर/भंडारा :- जिल्ह्यातील बाळ विक्री प्रकरणाची धग अजून ओसरलेली नसतानाच आणखी एक स्फोटक खुलासा समोर आला आहे. गोंदियातील डॉ. नितेश वाजपेयी यांनीच डिसेंबर २०२५ मध्ये मोहदुरा येथील एका दाम्पत्याला तब्बल ४ लाख ७० हजार रुपयांत नवजात बाळ विकल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील
मोहगाव (देवी) येथून महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने संबंधित बाळाला
ताब्यात घेतले, कारवाई दरम्यान परिसरात मोठी खळबळ उडाली होती. बाळाची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या
सुरक्षिततेची खात्री करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया गतीने राबविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी गोंदिया येथे उघड झालेल्या नवजात बाळ विक्री प्रकरणातही डॉ. नितेश वाजपेयी यांचे नाव समोर आले होते. त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांत दुसरे प्रकरण उघड होणे, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. त्यामुळे हा केवळ वेगळा व्यवहार नसून, संगनमताने चालणाऱ्या साखळीचा भाग असण्याची शक्यता तपासात व्यक्त होत आहे.
डिसेंबर २०२५ मधील कथित व्यवहारात पैशांची देवाणघेवाण नेमकी कशी झाली? मध्यस्थांची भूमिका काय होती? बाळाचे मूळ पालक कोण? दाम्पत्याने दत्तक प्रक्रियेऐवजी थेट व्यवहाराचा मार्ग का स्वीकारला? या सर्व
प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाचा फास अधिक घट्ट केला आहे. संबंधित दाम्पत्यासह इतर संशयितांची चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहारांचे धागेदोरेही तपासले जात आहेत.
सलग उघड होत असलेल्या घटनांमुळे खासगी वैद्यकीय क्षेत्र, बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया आणि बाल संरक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निरागस नवजातांच्या भवितव्याशी पैशासाठी खेळ करणाऱ्या संभाव्य रॅकेटचा पर्दाफाश होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाने प्रशासनालाही सतर्क केले असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भंडाऱ्यातील या नव्या घडामोडीने समाजमन हादरले असून कठोर कारवाईची मागणी जोर धर आहे.
0 Response to "भंडाऱ्यात आणखी एका नवजात बाळाचा सौदा उघड."
एक टिप्पणी भेजें