तुमसर शहरात रेतीचे ओव्हरलोड ट्रक बनले 'यमदूत'; नगराध्यक्ष सागर गभने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव.
बुधवार, 4 फ़रवरी 2026
Comment
शहरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याची मागणी; प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- तुमसर शहराच्या मुख्य बाजारपेठेतून आणि रहिवासी भागातून होणारी रेतीची ओव्हरलोड अवैध वाहतूक नागरिकांच्या जिवावर उठली आहे. या गंभीर प्रकारामुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, ही वाहतूक तातडीने बंद करून इतरत्र बायपास मार्गाने वळवावी, या मागणीसाठी तुमसर नगर परिषदेचे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
गेल्या काही दिवसांपासून तुमसर शहरात रेती वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगराध्यक्षांनी प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांवरून शेकडो ट्रक भरधाव वेगाने धावत असून, यामुळे सामान्य नागरिक, पादचारी आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
------@----
निवेदनातील प्रमुख मुद्दे :
जीवघेणे अपघात : भरधाव रेती ट्रकांमुळे शहरात अनेक भीषण अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत.
विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात : तुमसर हे शैक्षणिक केंद्र असल्याने हजारो विद्यार्थी सायकलने किंवा पायी प्रवास करतात. या अवजड ट्रकांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रस्त्यांची दुरवस्था : विहित मर्यादेपेक्षा जास्त रेती भरल्यामुळे शहरातील रस्ते अल्पावधीतच खराब होत आहेत.
नियम धाब्यावर : पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही चालक जाणीवपूर्वक शहरातून वाहने नेतात, याकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.नगराध्यक्ष इंजि.सागर गभने यांनी मागणी केली आहे की, तुमसर शहरांतर्गत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी आणि ही वाहतूक बायपास मार्गे वळवण्यात यावी. तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांवर केवळ दंड न आकारता कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत आणि एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि आरटीओ भंडारा यांनाही माहिती व कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तुमसरवासीयांचे लक्ष लागले आहे.
0 Response to "तुमसर शहरात रेतीचे ओव्हरलोड ट्रक बनले 'यमदूत'; नगराध्यक्ष सागर गभने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव."
एक टिप्पणी भेजें