(लेख)'एआय इम्पॅक्ट समिट'मधील गलगोटीयास विद्यापीठाच्या नेहा सिंग यांच्या ज्या वाक्याने सगळा वाद उफाळून आला.-आनंद भंडारे.
शुक्रवार, 20 फ़रवरी 2026
Comment
संकलन संग्रहक
कुलदीप गंधे हर्षवर्धन देशभ्रतार
'एआय इम्पॅक्ट समिट'मधील गलगोटीयास विद्यापीठाच्या नेहा सिंग यांच्या ज्या वाक्याने सगळा वाद उफाळून आला आणि 'एआय इम्पॅक्ट समिट'च्या उद्घाटनापूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूणच आपल्या देशाचं जे हसं झालं, ते वाक्य आहे...“You need to meet Orion. This has been developed by the Centre of Excellence at Galgotias University.”
अर्थात, 'ओरीयन' नावाचा रोबो डॉग हा गलगोटीयास विद्यापीठाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स विभागामार्फत विकसित केला आहे.
मात्र 'ओरीयन' रोबो डॉग हा मुळात युनिट्री गो - २ या नावाचा चिनी कंपनीचा रोबो असून बाजारात तो खरेदीसाठी उपलब्ध आहे, ही माहिती समोर आली. 'आमच्या विद्यापीठाने विकसित केला आहे' असं म्हणणार्या नेहा सिंग यांनीच शेवटी कबूल केलं की 'आम्ही विद्यार्थ्यांसाठी हा रोबो बाजारातून खरेदी केला आहे'. त्यामुळे गलगोटीयास विद्यापीठाची ही लबाडी जगजाहीर झाली. आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आदेशानंतर या एआय एक्स्पोमधून विद्यापीठाला तात्काळ आपला गाशा गुंडाळावा लागला.
थोडक्यात, नेहा सिंग यांच्या अतिशयोक्त उथळपणाची शिक्षा एकूण विद्यापीठाला भोगावी लागली, असा सगळा सूर त्यातून निघाला.
हे सगळं योग्यचं झालं!
पण यातला एक मुद्दा जाणीवपूर्वक म्हणा वा अजाणतेपणाने सुटतो आहे, असं वाटतं.
नेहा सिंग यांच्या ज्या वाक्यामुळे हा सगळा गदारोळ झाला तो व्हिडिओ केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या समाजमाध्यमावर टाकून त्याचे कौतुक केले होते.
त्या खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या एक्स पोष्टवर या तथाकथित 'ओरीयन' रोबो डॉगचा फोटो टाकून पुढीलप्रमाणे लिहिले होते...
Bharat's sovereign models are performing well on global benchmarks. Success of the sovereign stack marks a significant achievement for our engineers and innovators.
अर्थात, भारताने विकसित केलेले एआय मॉडेल्स जागतिक मानकांवर उत्तम कामगिरी करत आहेत. हे आपल्या देशातील अभियंते व नवकल्पना करणाऱ्यांसाठी मोठे यश मानले जात आहे.
अश्विनी वैष्णव यांच्या या ट्वीटची सुरुवातच Bharat's या शब्दाने होते, हे इथे महत्वाचे!
आता मला सांगा जी गोष्ट नेहा सिंग यांनी सांगितली तीच गोष्ट अश्विनी वैष्णव यांनीसुद्धा सांगितली. शब्दांचा थोडाफार फरक असेल पण एकूण मथितार्थ तर दोघांचाही सारखाच आहे.
पण याबद्दल माध्यमांनी प्रश्न कुणाला विचारले? नेहा सिंग यांना!
माफी कुणी मागितली? विद्यापीठाने!
खापर कुणावर फुटले? नेहा सिंग यांच्यावर!
मात्र यातली एकही गोष्ट अश्विनी वैष्णव यांच्याबाबत घडली नाही. त्या ट्वीटबद्दल दिलगीरी सोडा साधा उल्लेखही नंतर मंत्र्यांनी केला नाही.
का?
कारण नेहा सिंग या प्राध्यापक आहेत तर अश्विनी वैष्णव मोदीजींच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत!
प्राध्यापक चूक करूच शकतो पण मंत्री अजिबात नाही!
त्यात जर मंत्री मोदीजींच्या मंत्रिमंडळातील असेल तर अहाहा. कुणाची हिंमत आहे का त्यांना प्रश्न विचारण्याची?
गेल्या बारा वर्षाच्या कार्यकाळात हेच तर प्रत्येक वेळी आपल्याला पहायला मिळतंय.
नरवणेंचे पुस्तक प्रकाशित नाही म्हणून संसदेत त्यावर बोलायचं नाही. पण दीड वर्ष झालं तरी हे पुस्तक प्रकाशित का करत नाही, यावर राजनाथ सिंग काहीही बोलणार नाहीत.
तीन-चार वेळा जेफ्री एपस्टिनला भेटलो एवढंच सांगतील. पण त्याव्यतिरिक्त कोणताही तपशील हरदीप पुरी कधीही सांगणार नाहीत.
पुलवामात तीनशे किलो आरडीएक्सने स्फोट केला, हे ओरडून सांगणार. पण ते तिथपर्यंत आलं कसं, याबद्दल अमित शाह कधीही सांगणार नाहीत.
अमेरीकेसोबत ऐतिहासिक करार केला, त्याचे हारतुरे घालून सेलिब्रेशन करतील. पण त्या करारात नेमकं आहे काय, याबद्दल मोदीजी कधीही पारदर्शकपणे सांगणार नाहीत.
आणि भक्तांसह त्यांची आख्खी पिलावळ सांगणार की मोदीजींच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचार झालेला नाही! भ्रष्टाचार दरवेळी पैशातच होतो असं काही नाही. तो भ्रष्ट आचार आहे. वागण्या-बोलण्यातूनही होतोच की!
मोदीजींची हीच आदर्श राज्यपद्धती इतकी खाली झिरपली आहे की ढळढळीत चोरी पकडली गेलीय हे माहित असूनही त्याचा कुठलाही खेद वा खंत नेहा सिंग यांच्या वागण्या, बोलण्यात दिसत नाही. किंबहुना तुम्हीच चुकीचा अर्थ काढला इथवर त्यांची मजल गेली!
कुठल्याही गोष्टीची जबाबदारी स्वत:वर घ्यायची नाही, हाच तर मोदीजींचा 'नया भारत'मधील लोकांना संदेश आहे.
त्यामुळे आपल्याला कितीही काहीही वाटलं तरी या 'नया भारत' मध्ये ठिकठिकाणी अशा गोष्टी घडत राहणार आणि मोदीजींच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणार्या नवनव्या रूपातील नेहा सिंग आणि अश्विनी वैष्णव आपल्याला कुठे ना कुठे भेटत राहणार!
आनंद भंडारे, १९ फेब्रुवारी २०२६
0 Response to "(लेख)'एआय इम्पॅक्ट समिट'मधील गलगोटीयास विद्यापीठाच्या नेहा सिंग यांच्या ज्या वाक्याने सगळा वाद उफाळून आला.-आनंद भंडारे."
एक टिप्पणी भेजें