-->
नरभक्षी बिबट्याचा थरार ; हल्ल्यात बालिका ठार.

नरभक्षी बिबट्याचा थरार ; हल्ल्यात बालिका ठार.



• साकोली तालुक्यातील विर्शी येथील हृदयविदारक घटना

• चार घटनांमध्ये महिनाभरातील तिसरा बळी

• वनविभागाचे अपयश; परिसरात भितीचे वातावरण
            
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्तपत्र प्रतिनिधी  

साकोली :- गेल्या महिनाभरापासून वाघाच्या दहशतीने नागझिरा अभयारण्यालगत असलेल्या साकोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून चार जीवघेण्या घटनांमध्ये तीघांचा बळी गेला आहे व एक जखमी रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटना ताज्या असतांनाच दि. १५ एप्रिल २०२६ रोज बुधवारला पहाटे ५ वाजता विटाभट्टीच्या कामावर असलेल्या परराज्यातील मजूराच्या ५ वर्षिय बालिकेवर वाघाने जीवघेणा हल्ला करून तिला ठार केल्याची हृदयद्रावक घटना विर्शी येथील शेतशिवारात उघडकीस आली असून त्यामुळे पुन्हा एकदा परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अंशिका काशीनाथ मिरी असे या दुर्दैवी बालिकेचे नाव असून वनविभागाच्या अपयशामुळे हे बळी होत

असल्याची जनतेमध्ये भावना आहे.

सविस्तर वृत्तानुसार विर्शी ते तुडमापूरी मार्गावर कपूर नदीच्या काठावर विर्शी येथील संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीचे काम करण्याकरिता अनेक दिवसांपासून मजूर राहत आहेत. छत्तीसगड येथील बलोदपूर जिल्ह्यातील सुहेला गावातील

रहिवाशी काशीनाथ मिरी आपल्या परिवारासह पोटापाण्यासाठी येथे विटाभट्टीचे काम करण्यासाठी एका झोपडीत राहत आहेत. दि. १५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता दरम्यान काशीनाथ यांची ५ वर्षीय छोटी मुलगी अंशिका लघुशंकेसाठी बाहेर निघाली असता आधीच दबा धरून असलेल्या

वाघाने अचानक जीवघेणा हल्ला केला. अचानक घडलेल्या घटनेने अंशिका जोरात किंचाळली असता वाघाने अगोदर तिला सोडले. एवढ्यात तिचे कुटुंबिय जागे झाले. मात्र दुसऱ्याच क्षणी वाघाने परत झडप घेवून तिच्या नरडीचा घोट घेतला व ठार केले. सर्वांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघाने तिचे प्रेत लगतच्या मक्याच्या शेतात टाकून पलायन केले. लगेच वनविभागाला व पोलीस विभागाला याची कल्पना देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी साकोली उपजिल्हा रूग्णालयात आणले.

अंशिकाच्या कुटुंबात तिचे आईवडील व एक मोठा भाऊ आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी तिचे कुटुंब छत्तीसगड सोडून महाराष्ट्रातील विर्शी येथे आले आहेत. वनविभागाच्या लापरवाहीमुळे म्हणा किंवा तिचे दुर्दैव म्हणा तिचा या जीवघेण्या हल्ल्यात दुर्दैवी असा हृदयद्रावक अंत झाला. या चौथ्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आणि तिघांचा बळी गेल्यानंतर आणखी किती जिवांचा बळी घेतल्यानंतर या वाघाचा बंदोबस्त करण्यात येईल असा या परिसरातील नागरिकांचा सवाल आहे. या घटनेमुळे

परिसरात भितीचे वातावरण पसरले असून धान पिक व मका कापणीस आल्यानंतरही शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.

चार जीवघेण्या हल्ल्यांमध्ये तिघांचा बळी

गेल्या महिनाभरापासून साकोली तालुक्यात वाघाची दहशत कायम असून चार जीवघेण्या हल्ल्यांमध्ये तिघांचा बळी गेला असून एक महिला गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात उपचार घेत आहे. दि. १९ मार्च रोजी बाम्पेवाडा येथील वसंत मेश्राम वय ५३ या शेतात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा नरभक्षी वाघाने बळी घेतला. ही घटना ताजी असतांनाच दि. २८ मार्च रोजी उमरझरी येथील माया सोनवाने वय ५५ या महिलेवर शेतात मिरची तोडणीसाठी गेली असतांना हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. तिचा उपचारादरम्यान दि. १ एप्रिल रोजी रूग्णालयात मृत्यू झाला. त्याच दिवशी सकाळी आमगाव बुज येथील छाया सुधाकर मुंगमोडे वय ४३ या शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने जीवघेणा हल्ला केला. तिचा मुलगा तन्मयने प्रसंगावधान राखून मातेचे प्राण वाचविले. छायावर अजूनही

उपचार सुरू आहेत व आता दि. १५ एप्रिल रोजी विर्शी येथील ५ वर्षीय बालिका अंशिका काशीनाथ मिरी हिचा नरभक्षक वाघाने बळी घेतला. वनविभाग अपयशी

गेल्या महिनाभरापासून हायटेक पद्धतीने वनविभाग वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी वनविभागाचे जवळपास १०० अधिकारी व कर्मचारी अथक परिश्रम घेत असल्याची माहिती आहे. त्यासाठी ड्रोन कॅमेरे, ट्रॅपकॅमेरे, मचान, पिंजरे अशा सर्व गोष्टी केल्या जात आहेत. मात्र या प्रयत्नाला अपयश आले असून वाघ अद्यापही हुलकावनी देत असून नियमितरित्या निरपराध नागरिकांचे बळी घेत आहे. वनविभागाने वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी परिसरात जनजागृती मोहिम चालविली आहे. काही गावांमध्ये शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना उलटे मुखवटे वाटले मात्र सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातारवरण पसरले आहे. कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा फार मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

0 Response to "नरभक्षी बिबट्याचा थरार ; हल्ल्यात बालिका ठार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article