-->
“कलम ३४० हे ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; संविधानाचे पावित्र्य जपूया” - प्राचार्य राहुल डोंगरे.

“कलम ३४० हे ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; संविधानाचे पावित्र्य जपूया” - प्राचार्य राहुल डोंगरे.


• शारदा विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; विद्यार्थ्यांना समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"

तुमसर/भंडारा :- “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित, शोषित आणि वंचित समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी संविधानातून सर्व घटकांना न्याय मिळावा, यासाठी भक्कम पाया घातला. विशेषतः ओबीसी समाजाच्या हक्कांचा विचार करून राज्यघटनेत कलम ३४० समाविष्ट केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी आयोग स्थापन करण्याचा मार्ग खुला झाला,” असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.
स्थानिक शारदा विद्यालय, तुमसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका ज्योती बावनकर आणि श्रीराम शेंडे उपस्थित होते.
प्राचार्य राहुल डोंगरे पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश देऊन संपूर्ण समाजाला जागृत केले. महिलांचे अधिकार, कामगारांचे हक्क, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता यासाठी त्यांनी अथक कार्य केले. अस्पृश्यता, जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रखर लढा उभारला. त्यामुळे भारतीय लोकशाही अधिक सक्षम आणि सशक्त झाली.”
“भारत देश संविधानावर चालतो. त्यामुळे संविधानाचे पावित्र्य जपणे, समतेची भावना जोपासणे आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देणे, हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनी दर्शनी काहलकर, आर्या बुरडे, आर्या माटे तसेच विद्यार्थी तन्मय पटले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या घोषवाक्यांनी आणि प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि ग्रंथ भेट देऊन प्राचार्य राहुल डोंगरे यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे संचालन गुंजन कामथे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूर्वी नगरधने यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक गडपायले, संजय बावनकर, अशोक खंगार, विद्या मस्के,नितुवर्षा मुकुर्णे, प्रिती भोयर, सारिका आठोडे-भोयर, सुकांक्षा भुरे, बेनिता रंगारी, श्रेया उरकुडे,नेहा बारई, अंकलेश तिजारे, झणकेश्वरी सोनावणे, विद्या देशमुख, बंदिनी दातेबाई, मानकर बाई, दीपक बालपांडे, नारायण मोहनकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी विचारप्रवर्तक, प्रेरणादायी आणि संविधान मूल्यांची जाणीव करून देणारा ठरला.

0 Response to "“कलम ३४० हे ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; संविधानाचे पावित्र्य जपूया” - प्राचार्य राहुल डोंगरे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article