-->
विश्व योग दिनाचे महत्त्व

विश्व योग दिनाचे महत्त्व



      .  

        एकवीस जून । विश्व योग दिन । 
        आरोग्याचा दिन । जगात या ॥
        योग नि योगाने । प्रतिमा जगात । 
        होई वृद्धिंगत । भारताची ॥

                  आज दि.२१ जून २०२६ रोजी असलेल्या १२ व्या " विश्व योग दिना " निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥ विश्व योग दिन हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. मानवी शरीर आणि मनाच्या निरोगी आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्त्व पटवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.योग ही प्राचीन भारताने जगाला दिलेली एक अमूल्य आणि ऐतिहासिक देणगी आहे.भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दि.२७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत "जागतिक योग दिन" साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.या प्रस्तावाला जगातील १७७ देशांनी पाठिंबा दिला,जो संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासातील एक विक्रम आहे.

पुढे दि.११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे २१ जून हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून घोषित केला. दि.२१ जून २०१५ रोजी " पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन " संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला.२१ जून हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.या दिवशी सूर्यप्रकाश सर्वाधिक काळ टिकतो, जो मानवी शरीराला ऊर्जा आणि दीर्घायुष्य प्रदान करतो.पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे 21 जून रोजी 13 तास 13 मिनिटांचा दिवस राहणार आहे यामुळे 21 जून रोजी वर्षातला सर्वात मोठा दिवस राहील.

         जागतिक योग दिवसाचा मुख्य हेतू लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे हा आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात मानसिक शांतता मिळवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे.
        योगानेच होई । मनाची ही शांती ।
        शरीराची क्रांती । जीवनात ॥
योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून ते शरीर,मन आणि निसर्गाशी एकरूप होण्याचे साधन आहे.नियमित योगासने केल्याने शरीराची लवचिकता,ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.इतरांप्रमाणेच वृद्ध व्यक्तीसाठी योगाचे खूप महत्त्व आहे.योग केल्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी आणि जीवन आनंदी राहते.प्राणायामाच्या माध्यमातून फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. 
        वाढविते योग । फुफ्फुस क्षमता ।
         रक्ताची शुद्धता । वृद्धिंगत
ध्यान (Meditation) केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि मानसिक ताणतणाव, चिंता दूर होते.योग हा मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आधुनिक जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध आसने उपयुक्त ठरतात.यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा विकसित होते.कोणत्याही वयोगटातील व्यक्ती लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत स्वतःच्या क्षमतेनुसार सहज योग करू शकतात. 
       २१ जून रोजी जगातील १९० पेक्षा जास्त देशांमध्ये सामूहिक योग साधना आयोजित केली जाते.आपल्या भारतातील शाळा,महाविद्यालये,सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक मैदानांवर भव्य योग शिबिरांचे आयोजन करतात.जगभरातील प्रसिद्ध वास्तू आणि पर्यटन स्थळांवर हजारो लोक एकत्र येऊन योग करतात.सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून या दिवशी योगाचे थेट प्रक्षेपण करून जनजागृती केली जाते.विविध संस्थांद्वारे योग स्पर्धा,निबंध लेखन आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते.योग दिनामुळे भारताची संस्कृती आणि 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागतिक पातळीवर पोहोचली आहे.संयुक्त राष्ट्रांच्या (UN) माध्यमातून या दिवशी जागतिक शांतता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी विशेष संदेश दिला जातो.विश्व योग दिवस हा आपल्याला केवळ एक दिवस योग न करता, त्याला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवण्याची प्रेरणा देतो.

      " करू नये योग । एकाच दिवशी ।
      व्हावी रोजनिशी । माणसांची
     जागतिक योग । दिनाच्या शुभेच्छा ।
     मनस्वी सदिच्छा । सर्वांनाच ॥"

   
        राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील 
              शिक्षक पुरस्कार प्राप्त 
                      अभंगकार
         प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,   
          अमरावती.8087748609

0 Response to "विश्व योग दिनाचे महत्त्व"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article