माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या दि.२७ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त.
गुरुवार, 30 जुलाई 2026
Comment
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम एक
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व: शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती
भारताचे ‘मिसाईल मॅन’, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती,युवा पिढीचे स्वप्नद्रष्टे स्वप्न पाहण्यास शिकवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व,जनतेच्या मनातील आदर्श राष्ट्रपती,एक महान कर्मयोगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या दि.२७ जुलै २०२६ ला असलेल्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम असे होते.त्यांचा जन्म दि.१५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम् येथे एका गरीब तामिळ कुटुंबात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलबदीन आणि आईचे नाव आशियम्मा होते. लहानपणी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते वृत्तपत्रे विकण्याचे काम करायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण रामेश्वरम् मध्ये आणि उच्च शिक्षण तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले.
डॉ.अब्दुल कलाम यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) वैज्ञानिक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले.भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या (SLV-III) निर्मितीमध्ये त्यांनी प्रकल्प संचालक म्हणून मोलाची भूमिका बजावली.
या वाहनाद्वारे 'रोहिणी' उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. डॉ.अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 'अग्नी' आणि 'पृथ्वी' सारख्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची यशस्वी निर्मिती केली. त्यांच्या याच ऐतिहासिक संरक्षण योगदानामुळे त्यांना 'मिसाईल मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते. १९९८ मध्ये झालेल्या 'पोखरण-२' अणुचाचणीत त्यांनी मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती . सन -२००२ मध्ये त्यांची भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून बहुमताने निवड झाली. आपल्या साधेपणामुळे आणि सुलभ स्वभावामुळे ते संपूर्ण देशात 'जनतेचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी देशातील तरुणांना आणि लहान मुलांना नेहमी मोठ्या स्वप्नांचा ध्यास घेण्याची प्रेरणा दिली.त्यांच्या अद्वितीय देशसेवेसाठी भारत सरकारने १९८१ मध्ये 'पद्मभूषण' आणि १९९० मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.१९९७ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' प्रदान करण्यात आला. जगभरातील अनेक नामांकित विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवले. त्यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने वाचन संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य फार मोठ्या प्रमाणात होते.
डॉ.अब्दुल कलाम यांनी 'विंग्स ऑफ फायर'
(अग्नीपंख), 'इग्नायटेड माइंड्स' आणि 'इंडिया २०२०' सारखी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली. "स्वप्न ते नसतात जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत," हा त्यांचा विचार जगप्रसिद्ध आहे. भारताला २०२० पर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्याचे त्यांचे मोठे स्वप्न होते.राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी विविध संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले. महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आणि त्यांना प्रेरित करण्यात घालविले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि देशाचे आदर्श नागरिक बनण्यासाठी केलेले मार्गदर्शन व उपदेश अनमोल आहेत . डॉ. कलाम म्हणत होते की, विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. त्यांच्या मते "स्वप्न ते नसतात जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत. "विचार नेहमी उच्च ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी ध्येय निश्चित करा. केवळ स्वप्ने पाहून चालणार नाही, तर त्या दिशेने सतत प्रयत्न केले पाहिजेत. स्वप्नांचे रूपांतर आधी विचारांमध्ये होते आणि विचारांचे रूपांतर कृतीत होते, त्यामुळे आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून कृती करणे गरजेचे आहे. सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळा यश सहज मिळत नाही, त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. जर तुम्हाला आयुष्यात चमकून दाखवायचे असेल, तर आधी स्वतःला कष्टाच्या आणि मेहनतीच्या भट्टीत झिजवायला शिका.सातत्य आणि कठोर परिश्रम हाच यशाचा एकमेव मार्ग आहे. अपयशाला घाबरू नका. डॉ. कलाम यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाण्याचा सल्ला दिला.
'FAIL' (फेल) या शब्दाचा अर्थ 'First Attempt In Learning' (शिकण्याचा पहिला प्रयत्न) असा आहे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक अपयश ही शिकण्याची एक नवीन संधी असते, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय व कॉलेज जीवनात जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यावर भर दिला पाहिजे. ज्ञान हे तुम्हाला सामर्थ्यवान आणि स्वावलंबी बनवते. वेळेचा अपव्यय न करता त्याचा योग्य आणि चांगल्या गोष्टींसाठी वापर करा. डॉ. कलाम यांचा तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्वास होता. मुलेच देशाचे भवितव्य बदलू शकतात असे ते मानत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या त्यांच्या या विचारांचे आचरण करण्याची आज आवश्यकता आहे .
दि.२७ जुलै २०१५ रोजी शिलाँग येथे आयआयएम (IIM) मध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते अनंतात विलीन झाले. संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करणारे प्रखर देशभक्त माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या दि.२७ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
समाजभूषण पुरस्कार प्राप्त साहित्यिक,
अमरावती.८०८७७४८६०९
0 Response to "माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या दि.२७ जुलै २०२६ रोजी असलेल्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त."
एक टिप्पणी भेजें