'कृषीमित्र' पदभरतीची ती जाहिरात बोगस.
बुधवार, 1 जुलाई 2026
Comment
• विभागीय कृषी सहसंचालकांचे सुशिक्षित बेरोजगारांना आवाहन.
अविनाश गोंडाणे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अमरावती :- दि. ३०: (वि.प्रतिनिधी) कृषी विभाग, महाराष्ट्र शासन अथवा कोणत्याही कृषी विद्यापीठामध्ये 'कृषीमित्र' नावाचे कोणतेही अधिकृत पद अस्तित्वात नाही. तसेच अशा बोगस जाहिरातींची किंवा संस्थांशी कृषी विभागाचा कोणताही संबंध नाही. सध्या विविध माध्यमांवर या पदासाठी सुरू असलेली मेगा भरती पूर्णपणे बोगस असून सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींना बळी पडू नये, असे जाहीर आवाहन अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे.
सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर 'कृषीमित्र' पदासाठी हजारो जागा, आकर्षक वेतन आणि प्रशिक्षणाचे आमिष दाखवून जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात आहे.
या बोगस भरती प्रक्रियेची कृषी विभागाने गंभीर दखल घेतली असून, अशा खोट्या जाहिराती पसरवणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या संस्था व संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे (Criminal cases) दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पैशांची देवाणघेवाण करू नका; पोलिसांत तक्रार करा:
नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडून कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करू नये. तसेच, आपल्या परिसरात अशी बोगस भरती सुरू असल्याचे आढळल्यास किंवा यासंदर्भात काही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय किंवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
0 Response to "'कृषीमित्र' पदभरतीची ती जाहिरात बोगस."
एक टिप्पणी भेजें