कोरोना महामारीपेक्षा राज्यातील दुष्काळाचे संकट मोठे.
मंगलवार, 6 अक्टूबर 2026
Comment
विषेश प्रतिनिधी
प्रदिप कडबे
साप्ताहिक "जनता की आवाज"
नागपूर :- राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून, कोरोना महामारीपेक्षाही हे संकट मोठे आहे. पुढील आठ महिने पाणी, चारा आणि शेतकरी-
शेतमजुरांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी सामाजिक भान ठेवून काम केले पाहिजे व नागरिकांनीदेखील उत्सवांवर होणारा खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यावर भर दिला पाहिजे, असे
आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दुष्काळी परिस्थितीत उत्सव साजरा न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, हारतुरे स्वीकारू नयेत, वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करू नयेत. अनेक भागांत पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतकरी व शेतमजूर अडचणीत आहेत. त्यामुळे हार, फुले, बुके, बँड यावर खर्च करण्याऐवजी तो पैसा गरजूंच्या मदतीसाठी वापरावा. दुष्काळी कामांसाठी प्रत्येकाने योगदान देण्याची भूमिका घ्यावी. दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलेंशी चर्चा करणार..
भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांना उमेदवारी न मिळाल्याने काहीशी निराशा झाली असली तरी ते पक्षाचे नेते आहेत. पक्षाने उमेदवार निश्चित केल्यानंतर सर्वानी एकत्रित काम करणे अपेक्षित आहे. आपण स्वतः सोले यांच्याशी चर्चा करून निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
एमपीएससीबाबत काँग्रेसवर टीका!..
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर निर्णय घेतले आहेत. तरीही काही आंदोलने सुरू असून, काँग्रेसकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
दहा टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ.
केवायसी किंवा अॅग्रीस्टॅक कार्डाच्या कारणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सुमारे दहा टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्जमाफी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
0 Response to "कोरोना महामारीपेक्षा राज्यातील दुष्काळाचे संकट मोठे."
एक टिप्पणी भेजें