पदवीधरच्या तिन्ही जागांवर मविआचा झेंडा
गुरुवार, 29 अक्टूबर 2026
Comment
• दोन शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा डंका; नागपुरात चुरशीची लढत, वंजारीच ठरले 'अभिजीत'.
साप्ताहिक "जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी हे भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पराभवाचा धक्का दिला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. नागपूरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, मतांचे बदलते गणित, पक्षांतर्गत नाराजी आणि अपक्ष नितेश कराळे गुरुजी यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची वंजारी यांना मिळालेली साथ यामुळे भाजपची रणनीती फसली.
औरंगाबाद मध्ये चव्हाणांना धक्का, पाटील विजयी.
छत्रपती संभाजीनगर :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी बाजी मारली. विद्यमान आमदार अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्या १८ वर्षांपासूनच्या मतदारसंघावरील वर्चस्वाला धक्का बसला आहे. दुसऱ्या पसंतीची ३९ पैकी २३ उमेदवारांची मते मोजल्यानंतर चव्हाण यांना ६०,९३५ मते तर प्रतापसिंह पाटील यांना ७४,१४२ मते होती. १३,२०७ मतांची आघाडी घेत पाटील यांनी विजय मिळवला,
पुणे पदवीधर : हर्षदा जाधव यांची बाद फेरीत मुसंडी.
पुणे :- राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळविला.
प्रदीर्घ मतमोजणीनंतर ४४ व्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत हर्षदा यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्मिता जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला. हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख १३ हजार ८४० मते मिळाली, तर स्मिता जाधव यांना १ लाख ३ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले.
पुणे शिक्षकमध्ये गावडेंनी फडकविला भाजपचा झेंडा
पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांनी १८ वर्षांच्या खंडानंतर पुन्हा भाजपचा झेंडा फडकविला. गावडे यांनी शिंदेसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन सानप यांचा ६,७७० मतांनी पराभव केला. एकूण वैध मतांमधून २५,७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यात गावडे यांना निर्धारित मते न मिळाल्याने २७ बाद फेऱ्यांनंतर २३,१७७ मते मिळाली. तर सानप यांना १६,३४७ मते मिळाली. येथून आजवर निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये गावडे (३०) सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. विद्यमान आमदार काँग्रेसचे जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर राहिले.
अमरावतीत पोहरेंचा पराभव, शिंदेसेनेचे सरनाईकच नायक
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये शिंदेसेनेचे किरण सरनाईक दुसऱ्या पसंति क्रंमाच्या अखेरच्या बाद फेरीत विजयासाठी आवश्यक १६,१३४ मतांचा कोटा पार करीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रा. अदिती पोहरे यांचा पराभव केला व मतदारसंघ पुन्हा राखला. पहिल्या पसंतीच्या फेरीपासून सरनाईक यांनी आघाडी घेतली होती. मात्र, विजय साकार करण्यास त्यांना २४ व्या बाद फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला. तब्बल ३२ तास सुरू असलेल्या या मतमोजणीमध्ये त्यांनी १६,६६३ मते मिळवित विजय मिळवला.
बॅलेट पेपरवर मतदान होते तेव्हा विरोधी पक्ष विजयी होतो: पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख आणि मराठवाड्यातून प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाल्याने विधानपरिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे यश मिळाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. ते म्हणाले, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर (बॅलेट) मतदान होते, तेव्हा विरोधी पक्ष विजयी होतो. बेकारी, महागाई, स्पर्धा परीक्षेत सुरू असलेला त्रास आणि ती चीड पदवीधरांनी व्यक्त केली.
मतपत्रिकांवर निवडणूक, शोधा काँग्रेस कुठेय; मोदींचा टोला
विधान परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस कुठेय हे शोधून दाखवा, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार व कर्नाटक या चार राज्यांतील २८ जागांसाठी निवडणुका मतपत्रिकांचा वापर करून घेण्यात आल्या. काँग्रेसने किती जागा जिंकल्या असतील, याचा अंदाज लावा, असे मोदी यांनी 'एक्स'वर म्हटले.
0 Response to "पदवीधरच्या तिन्ही जागांवर मविआचा झेंडा"
एक टिप्पणी भेजें