अहंकार मुळापासून उपटून काढा; शांतीचे बीज रुजवा— साहित्याचार्य महंत बाभूळगावकरबाबा.
सोमवार, 5 अक्टूबर 2026
Comment
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
नागपूर :- अहंकाराला मुळापासून उपटून काढले पाहिजे. अन्यथा त्याचे पुन्हा अंकुर फुटतात. अहंकार दूर केल्यानंतरच जीवनात शांतीचे बीज रुजवावे. आज संपूर्ण जगाला खऱ्या अर्थाने शांतीची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्याचार्य महंत बाभूळगावकरबाबा शास्त्री, करमाड, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी केले.
स्वामीदर्शन महानुभाव मंडळ, व महदाईसा महिला महानुभाव मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीगोविंदप्रभू व श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन महोत्सवाचे आयोजन रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) संताजी सभागृह, सोमवारी क्वॉर्टर, बुधवार बाजार, नागपूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्याचार्य प.पू.प.म. श्री बाभूळगावकरबाबा शास्त्री, करमाड हे होते. कार्याध्यक्ष म्हणून कवीश्वर कुलभूषण महंत गोपीराजबाबा शास्त्री (नवे), रिद्धपूर, जि. अमरावती उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषद, जिल्हा शाखा गोंदियाचे अध्यक्ष अॅड. के. आर. शेंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अॅड. शेंडे यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अॅड. रूपालीताई सावंत, मुंबई यांनी महानुभाव पंथाच्या संस्कारांविषयी भावना व्यक्त करताना, “या पंथामुळे माझ्यातील महदंबा जागृत झाली,” असे भावोद्गार काढले.कार्याध्यक्ष महंत गोपीराजबाबा शास्त्री यांनी समयोचित मार्गदर्शन केले, तसेच श्रीगोविंदप्रभू हे समाजाच्या तळागाळातील लोकांचे खरे उद्धारक होते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन महंत खंदारकरबाबा महानुभाव, संचालक परमार्ग साधना आश्रम, मनसर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुरुषोत्तमजी ठाकरे, सचिव, अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि महंत विश्वनाथबाबा कपाटे महानुभाव, संचालक, महानुभाव आश्रम, मनसर यांचीही शुभेच्छापर भाषणे झाली.
कार्यक्रमाला महंत कृष्णराजबाबा येळमकर, मौदा; महंत मायराजबाबा कारंजेकर, मनसर; महंत दत्तराजबाबा बेलापूरकर, नागपूर; महंत देगावकरबाबा, आठवामैल; महंत माधवव्यासबाबा चिरडे, देवळी (काळबांडे); महंत अरण्यग्रामकरबाबा अष्टूरकर, नागपूर तसेच अशोकराव खांडेकर, माजी नगर रचनाकार, मुंबई यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे संताजी सभागृहाचे ट्रस्टी नाना ढगे व चरण चोपकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी गजभिये यांनी केले. सूत्रसंचालन मनोज बोरकर यांनी केले, तर आभार रेखाताई पानतावणे यांनी मानले. महानुभाव समाजातील संत, महंत, अनुयायी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात महोत्सवाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच पंथीय स्नेही जण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Response to "अहंकार मुळापासून उपटून काढा; शांतीचे बीज रुजवा— साहित्याचार्य महंत बाभूळगावकरबाबा."
एक टिप्पणी भेजें