खापा चौफुलीवर धानाच्या पेंडी हातात घेत शेतकरी खवास यांचा भर चौकात ठिय्या !..
रविवार, 4 अक्टूबर 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
साप्ताहिक
"जनता की आवाज"
भंडारा/तुमसर : जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर दि. ३ आक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असताना, तुमसर व मोहाडी तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांचा तीव्र रोष पाहायला मिळाला.
दुष्काळामुळे उद्धवस्त झालेली पिके आणि हलाखीची परिस्थिती समोर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोखी भूमिका घेत खापा चौकात नष्ट झालेल्या धानाची पेंडी हातात धरून पालकमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे किंवा त्यांची व्यथा ऐकून न घेता थेट भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे पसंत केले, असा गंभीर आरोप संतप्त शेतकरी पवन खवास यांनी केला आहे.
पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला वेळ नाही, मात्र कार्यकर्त्यांना भेटायला वेळ आहे, असे म्हणत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी भेट न दिल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी खापा चौकातच रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पालकमंत्री प्रत्यक्ष भेट देऊन आमची व्यथा ऐकून घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. परिस्थिती अधिक चिघळल्यामुळे आणि तणाव वाढल्याने अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बळजबरीने ताब्यात घेतले. या घटनेमुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमधील प्रशासनाविषयीची आणि पालकमंत्र्यांच्या भूमिकेबद्दलची नाराजी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
0 Response to "खापा चौफुलीवर धानाच्या पेंडी हातात घेत शेतकरी खवास यांचा भर चौकात ठिय्या !.."
एक टिप्पणी भेजें