दिवाळीची सुट्टी : केवळ आनंदाची नव्हे, तर स्वतःला घडविण्याची सुवर्णसंधी!..
मंगलवार, 10 नवंबर 2026
Comment
• पालक आणि विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाचा संदेश...
प्रिय पालकहो आणि विद्यार्थी मित्रांनो,
दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि आनंदाने एकत्र येण्याचा सण आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांची प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतो. परीक्षा, अभ्यास आणि शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकातून काही दिवस मोकळीक मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद वाटणे स्वाभाविक आहे.
परंतु एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की, सुट्टी म्हणजे वेळ वाया घालविण्याची संधी नसून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याची एक सुवर्णसंधी आहे.
आजच्या काळात विद्यार्थ्यांकडे शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. चांगल्या शाळा, महाविद्यालये, पुस्तके, इंटरनेट, मोबाईल, संगणक, डिजिटल शिक्षण आणि पालकांचे मार्गदर्शन अशा अनेक गोष्टी सहज उपलब्ध आहेत. पूर्वीच्या पिढीला ज्या सुविधा मिळाल्या नाहीत, त्या आजच्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत.
मात्र दुर्दैवाने, यातील काही विद्यार्थी या सुविधांचा योग्य उपयोग करण्याऐवजी मोबाईल, सोशल मीडिया, रील्स, ऑनलाइन गेम्स आणि निरर्थक मनोरंजनामध्ये आपला अमूल्य वेळ खर्च करत आहेत.
काही विद्यार्थी वाईट संगतीच्या आहारी जात आहेत. अल्पवयातच चुकीच्या सवयी लागून त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अभ्यासाप्रती उदासीनता, शारीरिक हालचालींचा अभाव, चिडचिडेपणा आणि पालकांशी वाढणारे अंतर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मित्रांनो, जरा विचार करा...
तुमच्या आयुष्यातील गेलेला वेळ पुन्हा कधीच परत येणार नाही. पैसा पुन्हा कमावता येतो, हरवलेल्या वस्तू पुन्हा मिळवता येतात; पण एकदा निघून गेलेला वेळ परत मिळवता येत नाही.
म्हणूनच या दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग केवळ मौजमजा करण्यासाठी न करता स्वतःला अधिक सक्षम, आत्मविश्वासू आणि जबाबदार बनविण्यासाठी करा.
• विद्यार्थ्यांनी सुट्टीत स्वतःसाठी काय करावे?
१. वाचनाची आवड निर्माण करा.
दररोज किमान एक तास वाचनासाठी द्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध अशा महान व्यक्तींचे चरित्र वाचा. प्रेरणादायी पुस्तके वाचा. वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा.
२. मोबाईलचा योग्य वापर करा.
मोबाईल हा ज्ञान मिळविण्याचे प्रभावी साधन आहे; मात्र त्याचा अतिरेक नुकसानकारक ठरू शकतो. अनावश्यक रील्स, गेम्स आणि सोशल मीडियामध्ये तासन्तास वेळ घालवू नका. शैक्षणिक व्हिडिओ, विज्ञानविषयक माहिती आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम पाहा.
३. आपल्या अभ्यासातील कमतरता दूर करा.
मागील परीक्षेत ज्या विषयांमध्ये कमी गुण मिळाले, त्या विषयांचा अभ्यास करा. गणिताची उदाहरणे सोडवा, इंग्रजी संभाषणाचा सराव करा आणि लेखनाचा वेग वाढवा. पुढील शैक्षणिक वर्षासाठी पूर्वतयारी करा.
४. नवीन कौशल्ये आत्मसात करा.
संगणकाचे ज्ञान, टायपिंग, इंग्रजी संभाषण, चित्रकला, हस्तकला, वक्तृत्व, लेखन आणि इतर उपयुक्त कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा.
५. आरोग्याकडे लक्ष द्या.
दररोज सकाळी लवकर उठा. व्यायाम, योगासने, मैदानी खेळ आणि चालण्याची सवय लावा. योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या.
६. घरातील जबाबदाऱ्या स्वीकारा.
आई-वडिलांना घरकामात मदत करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधा. त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावा.
७. निसर्ग आणि पर्यावरणाशी मैत्री करा.
एक तरी झाड लावा आणि त्याचे संगोपन करा. पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर कमी करा आणि परिसर स्वच्छ ठेवा.
८. सामाजिक जाणीव निर्माण करा.
गरजू व्यक्तींना मदत करा. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी पुढाकार घ्या. वृद्ध व्यक्तींना सहकार्य करा. समाजातील समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.
९. स्वतःच्या ध्येयाचे नियोजन करा.
मला भविष्यात काय बनायचे आहे? माझे ध्येय काय आहे? ते साध्य करण्यासाठी मला कोणत्या गोष्टी शिकाव्या लागतील? याचा विचार करा आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी छोटे-छोटे संकल्प करा.
• पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना...
प्रिय पालकहो,
मुलांचे भविष्य घडविण्यामध्ये आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांना केवळ चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देणे, महागडे मोबाईल किंवा इतर सुखसोयी उपलब्ध करून देणे म्हणजे पालकत्वाची जबाबदारी पूर्ण झाली असे नाही.
त्यांच्या मनात काय चालले आहे, त्यांचे मित्र कोण आहेत, ते मोबाईलवर काय पाहतात, त्यांना कोणत्या गोष्टींची आवड आहे, त्यांच्या मनात काही चिंता किंवा प्रश्न आहेत का, याकडेही लक्ष द्या.
विशेषतः सुट्टीच्या काळात मुलांना भरपूर मोकळा वेळ मिळतो. या वेळेचा योग्य उपयोग व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद साधा.
* मुलांवर सतत रागावण्याऐवजी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधा.
* त्यांच्यासाठी सुट्टीचे छोटेसे वेळापत्रक तयार करा.
* मोबाईल वापरण्याबाबत योग्य मर्यादा निश्चित करा.
* मुलांना त्यांच्या आवडीचे छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहन द्या.
* त्यांच्या छोट्या यशाचेही कौतुक करा.
* इतर मुलांशी तुलना करून त्यांचा आत्मविश्वास कमी करू नका.
* त्यांच्या मित्रपरिवाराची आणि ऑनलाइन वावराची योग्य जाणीव ठेवा.
* त्यांच्यासोबत काही वेळ खेळा, वाचा आणि संवाद साधा.
* मुलांना केवळ चांगल्या सुविधा देण्यापेक्षा चांगले संस्कार, योग्य दिशा आणि वेळ देणे अधिक महत्त्वाचे आहे.
* मुलांना चुका करण्यापासून रोखणे आवश्यक आहेच; पण चूक झाल्यानंतर त्यांना योग्य मार्ग दाखविणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
चला, या दिवाळीत एक संकल्प करूया !.
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
या दिवाळीच्या सुट्टीत स्वतःला एक प्रश्न विचारा...
१) मी आज जे जीवन जगत आहे, ते माझ्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने योग्य आहे का?
२) माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी खरोखर प्रयत्न करीत आहे का?
३) माझ्याकडे असलेल्या वेळेचा आणि सुविधांचा मी योग्य उपयोग करीत आहे का?
४) या प्रश्नांची उत्तरे स्वतःच शोधा आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा.
५) लक्षात ठेवा, जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ हुशार असणे पुरेसे नाही. शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत, आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणेही आवश्यक आहे.
६) डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, शास्त्रज्ञ, शिक्षक किंवा उद्योजक होण्याचे स्वप्न नक्की पाहा; पण त्याचबरोबर एक चांगला माणूस, जबाबदार नागरिक आणि समाजाप्रती संवेदनशील व्यक्ती बनण्याचेही ध्येय ठेवा.
७) स्वतःच्या पायावर उभे राहा. आपल्या पालकांचा आधार बना. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी करा.
कारण स्वत :- पुरते जगणे हे जीवनाचे अंतिम ध्येय नसावे. आपल्या कर्तृत्वाचा उपयोग इतरांच्या जीवनात आनंद, आशा आणि परिवर्तन घडविण्यासाठी झाला पाहिजे.
शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा...
विद्यार्थी घडविणे म्हणजे केवळ परीक्षेसाठी तयार करणे नव्हे, तर त्यांना आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सक्षम बनविणे होय!
परीक्षेतील गुण तुमची शैक्षणिक गुणवत्ता दाखवतील; पण तुमचे विचार, संस्कार, वर्तन, कर्तृत्व आणि माणुसकी तुमचे खरे व्यक्तिमत्त्व घडवतील.
शिक्षण घ्या, स्वतःला घडवा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि आपल्या यशाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करा!
हीच या दिवाळीच्या सुट्टीतील खरी कमाई ठरो!
🪔 आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !..
भंडारा
0 Response to "दिवाळीची सुट्टी : केवळ आनंदाची नव्हे, तर स्वतःला घडविण्याची सुवर्णसंधी!.."
एक टिप्पणी भेजें