नास्तिकवादी व्यक्तिमत्व पेरियार रामास्वामी !.
शनिवार, 7 नवंबर 2026
Comment
प्रभाकर सोमकुवर
4/37 विश्वासनगर, नारा रोड,
जरीपटका, नागपूर-14
मो. क्र. 9595255952
भारतीय संस्कृतीला ज्या अमानवीय जाती संस्थेची कीड लागली त्या जाती संस्थे विरुध्द दक्षिण भारतातील एकमेव विद्रोही व्यक्तिमत्व म्हणजे पेरियार रामास्वामी नायकर! डॉ. बाबासाहेबांनी जसे दलितांच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य झोकुन दिले आणि दलितांच्या रक्तारक्तात सत्वाच्या जाणीवेची क्रांती पेरुन दिली. भारताचा इतिहास लिहतांना दलित जीवनाचाच नव्हे तर विधायक समाजक्रांतीचा अग्रनेता म्हणून डॉ. बाबासाहेबांना आधुनिक इतिहासकार विसरु शकत नाही. तशाच शाश्वत मूल्यांवर रामास्वामी नायकराशिवाय दक्षिण भारताचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेबांसारखे पांडित्य नायकरांच्या ठिकाणी नाही म्हणून कदाचित त्यांच्यात चळवळेपणा पेरला गेला असेल, परंतू अन्यायविषयीचा तीव्र रोष हिंदूच्या विषमतावादी संस्कृतीला फाडून टाकण्यास पूर्णपणे समर्थ आहे.
तामीळनाडूचं समाजजीवन आरपार बदलून टाकणाऱ्या या विद्रोही नेत्याचा जन्म 17 सप्टेंबर 1879 साली इरोड नावाच्या गावी झाला. वडील सधन होते, तारुण्याच्या उंबरठयावरुन त्यांनी अंधविश्वास, जातीवाद, रुढीवाद आणि वर्णव्यवस्थाप्रणित समाजरचनेविरुध्द रणशिंग फुंकले. ब्राम्हणवादाविरुध्दची त्यांची चीड अत्यंत हृदय पेटविणारी आहे. सामाजिक आंदोलनाची सुरवात जस्टिस् पक्ष व कझगम् पक्षाच्या व्यासपीठावरुन केली. विषमतावादाविरुध्द आणि उच्चवर्णियांच्या अस्पृश्य-शुद्रावरील सामाजिक गुलामगिरीविरुध्द द्रविड माणसांत प्रचंडसा तीव्र विद्रोह निर्माण केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे महाड नासिकासहित पूर्ण महाराष्ट्र अस्पृश्याच्या आंदोलनांनी हादरुन टाकला तसाच नायकरांनी संपूर्ण तामीळनाडू खिळखिळा केला. ज्या पोथी, पुराण, देव, धर्मग्रंथ यांनी जातीव्यवस्था जन्माला घातली त्या स्मृतीसहित सर्वाना खतम् केल्याशिवाय जातीभेदाचा नायनाट करणे व चार्तुवर्णव्यवस्था बदलणे अशक्य आहे.
हिंदूस्थानातल्या ब्राम्हणवादाशी कुठपर्यंत झगडा करावा या वैचारिकतेतून त्यांनी स्वतंत्र्य तामीळनाडूची मागणी उचलून धरली. या मुळाशी त्यांचे स्वप्न होते, दक्षिण स्वतंत्र्य राष्ट्र असणे म्हणजेच स्वातंत्र्य आणि समता असणे होय. त्यांचा लढा सामाजिक समतेसाठीच होता. तामीळनाडूतील कनिष्ठ व दलित जातीजमातीत त्यांनी स्वाभिमानाची ज्योत पेटविली. जन्माच्या आधारावर माणसामाणसात भेदभाव होऊ शकत नाही आणि अशा सर्व धार्मिक व सामाजिक पिळवणूकी विरुध्द त्यांनी तेथल्या माणसात प्रखर चिड निर्माण केली. असा हा क्रांतीकारी नेता वयाच्या 94 व्या वर्षापर्यंत वर्णव्यवस्थेच्या नरडीचा घोट घेऊन सामाजिक विषमतेवर व नैतिक मूल्यांवर आधारलेल्या मानवतावादी समाज निर्माण करण्यासाठी तीळ तीळ तडपला.
असे हे नास्तिकवादी व्यक्तिमत्व समता, स्वातंत्र्य व बंधुभाव या त्रयीवर आधारलेल्या समाजरचनेची नांदीच आहे. विवेक आणि तर्कावर प्रत्येक गोष्टीची परिक्षा करणारे रामास्वामी म्हणजे विज्ञानवादी व बुध्दिवादी युगाची परिक्षाच आहे. अशा यामहान क्रांतीकारी व वादळी व्यक्तिमत्वाचा नाईलाजाने शेवट दि. 24 डिसेंबर 1973 ला झाला, नाहीतर उच्चवर्णीयांचे प्रभुत्व आणि जातीवाद गाडूनच ते विसावले असते. अशा या विद्रोही व्यक्तिमत्वाच्या स्मृतीदिनानिमित्त मानाचा मुजरा !..
*****
0 Response to "नास्तिकवादी व्यक्तिमत्व पेरियार रामास्वामी !."
एक टिप्पणी भेजें