
प्रकरण घरकूल यादीत घोळ करून रेतीची विल्हेवाट
- दोषींवर कारवाई करण्यास तहसिलदारांची टाळाटाळ..
- न्यायासाठी तक्रारदाराची फरफट
नरेन्द्र मेश्राम
भंडारा जि.प्रती. :- घरकुल यादीत नाव नसताना तहसीलदार व त्यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांनी अश्विन शेंडे यांच्या नावे घरकुलच्या पाच ब्रास मोफत रेतीची ऑनलाईन नोंदणी केली, एवढेच नाही परस्पर रेतीची उचल करून रेतीची विल्हेवाट लावल्याची तक्रार अश्विन शेंडे यांनी या जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस निरीक्षक वरठी तसेच तहसीलदार भंडारा यांचेकडे केली. मात्र १५ दिवस लोटूनही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही याउलट तक्रादारदारालाच न्यायासाठी तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात चपला झिजवाव्या लागत आहेत. तहसीलदार माकोडे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असून आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप अश्विन शेंडे यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमाने काही दिवसांपूर्वी हे प्रकरण उघड केले होते. वाळूचा अवैध उपसा, वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबविण्याच्या हेतूने घरकूल लाभार्थींना प्रत्येकी पाच ब्रास वाळू मोफत दिली जात आहे. मात्र ही योजना पारदर्शक, नियोजनबद्ध आणि प्रामाणिक पद्धतीने राबविली जात नसल्याचे भंडारा येथील एका प्रकरणातून समोर आले आहे. मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी अश्विन शेंडे यांचे घरकुल यादीत नाव नसताना भंडारा तालुक्यातील घरकूल यादीत यांचे नाव समाविष्ट करून यांच्या नावावर ५ ब्रास वाळूची उचल करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या सोनाली गावातील घरकुलाच्या यादीत अश्विन यांचे नाव दाखविण्यात आले त्या ठिकाणी रेती न टाकता ट्रक चालकाने नसताना रेती इतरत्र टाकून गैरवापर केल्याचे शेंडे यांच्या लक्षात आले. ही केवळ आपलीच नाही तर शासनाची देखील फसवणूक होत असल्याने शेंडे यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.
तक्रारीच्या अनुषंगाने ट्रक क्रमांक एम.एच २७ बीएक्स ४१३४ चा ट्रक मालक सुमित नारनवरे आणि चालक कृष्णा यांनी २६ मे रोजी शेंडे यांच्या घरकुलच्या नावावर पवनी तालुक्यातील ईटगाव डेपो येथून रेतीची उचल करून खात रोड भंडारा येथे वाळू टाकली. या प्रकरणात जिल्हाधिकारी तसेच खनिकर्म अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदाराना दिले. मात्र चौकशी अहवाल सादर न करता थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेण्याचे काम तहसीलदार करीत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार माकोडे यांना विचारणा केली असता, ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले मात्र पवनी आणि भंडारा या दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. शिवाय ट्रक चालकाची चौकशी २६ जून रोजी करणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे चौकशी न करता गुन्हे दाखल करण्याचे निर्देश तहसीलदारानी कसे दिले हा प्रश्न उपस्थित होत आहे..
दरम्यान, घरकुलाला मोफत वाळू पुरवण्याची जबाबदारी शासनाने तहसीलदार यांच्यावर सोपवली आहे. भंडारा येथे शासनाची फसवणूक करून घरकुलाच्या मोफत वाळूची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. तहसीलदार यांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरू असून ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तहसीलदाराना यासाठी जबाबदार का धरू नये असा प्रश्न माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तहसीलदार यांच्यासमवेत संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी अश्विन शेंडे यांनी केली आहे.
चौकट
रेती जप्तीची किंवा दंडात्मक कारवाई नाही
घरकुलाच्या नावावर उचललेली ५ ब्रास वाळू ठराविक ठिकाणी न टाकता ट्रक चालकाने इतरत्र टाकली. रेतीचा गैरवापर झाला असताना १५ दिवस लोटूनही तहसीलदार यांनी रेती जप्तीची कारवाई किंवा ट्रक चालकावर दंडात्मक कारवाई का केली नाही, तक्रारीला १५ दिवस लोटूनही दोषींची चौकशी का करण्यात आली नाही असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे.
माहिती देण्यास टाळाटाळ
सदर प्रकरणाशी संबंधित मंजूर घरकुल यादी किंवा कोणतीही माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यास तहसीलदार माकोडे टाळाटाळ करीत आहेत. २६ जून रोजी तक्रारदार आणि काही जणांना पेशीसाठी बोलवण्यात आले असल्याचे माकोडे यांनी सांगितले.
0 Response to "प्रकरण घरकूल यादीत घोळ करून रेतीची विल्हेवाट "
एक टिप्पणी भेजें