वरवंटी वामन नगर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
रविवार, 3 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- लातूर जिल्ह्यातील वरवंटी वामन नगर येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वरवंटी ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच श्री पवन जाधव, उपसरपंच श्री राजेश रणखांब, वामन नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सरपंच श्री पवन जाधव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. विषमतेमुळे जातीव्यवस्थेचे चटके बसल्याने, अस्पृश्यतेच्या जाचामुळे बालपणीच वाटेगावची शाळा सोडावी लागली. तरीही त्यांनी कथा कादंबरी, पोवाडे, लोकनाट्य यांच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या वेदना व्यथा मांडल्या. जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अण्णाभाऊंनी म्हटलं होतं तो विचार पुढच्या पिढीने चालवावा असे आवाहन सरपंच श्री पवन जाधव यांनी केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीने भारतीय साहित्यात क्रांती घडवली. त्यांनी लिहिलेलं साहित्य केवळ कला, अभिव्यक्ती नव्हती. ते एक आंदोलन होतं, बंड होतं ! अण्णा भाऊंनी सुमारे ३५ हून अधिक कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, शेकडो लेख, पोवाडे, लोकनाट्यं आणि शाहिरी गीतं लिहिली. अन्यायाविरोधात बंड करणाऱ्या माणसाची कहाणी त्यांनी काल्पनिकतेच्या साहाय्याने नव्हे, तर वास्तवाच्या जळत्या भट्टीतून साकारली. त्यांनी लोककलेतून परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांचं साहित्य सामाजिक वास्तवाचं आरसपानी दर्शन घडवतं. झोपडपट्टीतील वेदना, अन्याय, भूक, बेरोजगारी, आणि सामाजिक विषमता यांचं त्यांनी प्रखर आणि थेट भाष्य केलं. या जयंतीचे औचित्य साधून वामन नगर परिसरातील लहान मुलांना पुलाव वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुंदर असे निवेदन सौ रमाताई कांबळे यांनी केले. यावेळी दगडू रसाळ, संजीव रसाळ, सागर कांबळे, लहू उदारे, लखन रसाळ, बबलू रसाळ, अमोल कांबळे, तानाजी अडगळे, किशोर कांबळे, शाम कांबळे, माणिक कांबळे, रितेश साठे, सुभाष रसाळ, केशव पंडित, बाबा कांबळे, बबलू चव्हाण, रमेश रसाळ, रितेश कांबळे, सतीश उमप, राहुल शिंदे, प्रशांत कांबळे, महिला भगिनी व लहानथोरासह वामन नगर परिसरातील कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "वरवंटी वामन नगर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी."
एक टिप्पणी भेजें