साकोलीत "व्यापारी संकुल" घोटाळा.?
सोमवार, 11 अगस्त 2025
Comment
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे पुरावे सादर
संजीव भांबोरे
भंडारा_ सध्या साकोली सेंदूरवाफा शहरातील स्थानिक मुळ निवासींचा व्यापार करण्यासाठी व्यापारी संकुलाचा व बाहेरील लोकांच्या अतोनात अतिक्रमणांचा गंभीर विषय गाजत आहे. त्यातच आता संतापजनक आणि तेवढाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. "व्यापारी संकुल साकोली" या नावाने शासकीय जिल्हा परिषद पुस्तकावर सन २०१२ मध्ये हजारोंच्या संख्येने जनतेकडून ५००/- रूपये घेऊन पावती देण्यात आली. मात्र अद्यापही १३ वर्ष लोटूनही व्यापारी संकुलाचा पत्ता नाही. तर ते हजारोंचे सुमारे ५ लाखांहून अधिक रूपये अखेर गेले कुठे.? हा एक नविनच घोटाळा उघडकीस आला आहे.
सविस्तर की, सन २०१२ मधे साकोली बाजारपेठेत दूकानांचे गाळे पंजीकरण करून जिल्हा परिषद अंतर्गत "व्यापारी संकुल" करीता एक संकुलाची पुस्तक देत फॉर्म भरण्यात आले. यातील एका पिडीत अर्जदाराच्या कागदपत्रांनुसार त्यांकडून फॉर्म नं. १० ची पावती क्र. ९५४८४२ बीके नं. ९३४९ नुसार ५००/- रू घेतले गेले. यात दि. २४/०५/२०१२ नमुद असून वर जिल्हा परिषद भंडारा व खाली पंचायत समिती असे इंग्रजीत ठळक अक्षरात लिहून आहे. फॉर्ममधे जिल्हा परिषद बांधकाम विभाग अर्जावर आवेदन क्र. ३१ व दि. ०७/०६/२०१२ व जोड पत्रिका, अर्जदाराने पूर्ण रक्कम, हप्ता रक्कम अदा करणे बाबत एरीया १५.४३, चौरस फूट १६६.१२ नुसार ब्लॉक डी-०३ यांची रक्कम ३४२५/- रूपये अंकीत केले आहे. पुस्तकात वर "जिल्हा परिषद भंडारा द्वारा शासकीय मान्यताप्राप्त" व्यापारी संकुल साकोली असे चिन्हीत आहे. यामध्ये आर्कीटेक्ट स्टूडियो ईलेव्हन दिल्ली नागपूर असे नकाशावर नमूद केले आहे. दिलेल्या नकाशायुक्त पुस्तकात मागील बाजूस योजना आरंभ २४ मे २०१२, योजना समाप्त ३१ मे २०१२ व सोडतीची दिनांक १५ जून २०१२ असुन व्यापारी संकुल गुणविशेष मध्ये मोकळ्या बाजारपेठेची संकल्पना, तळमजला व पहिला मजला पकडून २०९ दूकान, ४० फूट रुंद सिमेंट रोड, जलतरण सोय, भोजनालय, सार्वजनिक मुत्रालय असे विविध सुविधा नमूद केले होते. यात खाली माहितीसाठी संपर्क - सार्वजनिक बांधकाम उपविभाग साकोली आणि सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद भंडारा असे छापिल केले आहे. यात ही लघुपुस्तिका आवेदनपत्र ५०० रूपये भरून सा. बा. उपविभाग साकोली तसेच जिल्हा परिषद ( बांधकाम विभाग ) भंडारा येथून प्राप्त करू शकता. सर्व अटी व शर्ती जिल्हा परिषद भंडारा यांकडे राखीव आहेत व विस्थापितांना प्रथम प्राधान्य असे लिहिले होते. सन २०१२ ला साकोली शहरातील सुमारे हजारो फुटपाथ दूकानदारांनी व गरीब व्यापारींनी "व्यापारी संकुल साकोली" यामध्ये दूकान मिळेल याच आशेने प्रत्येकी ५०० रू भरले आहेत. परंतू आज २०१२ पासून चक्क १३ वर्षांपासून ना व्यापारी संकुल बनले, ना त्यांचे भरलेले पैसे परत मिळाले. हा चक्क शासनानेच तर जनतेसोबत ४२० फसवणूकीचा प्रकार तर केला नाही.? अशी पिडीत व्यापारी जनतेत संतापजनक लाट उसळली आहे. मग या जिल्हा परिषद पंचायत समिती छापील स्वरूपात पावतीवर कोण कोण ५०० रूपये घेऊन गेले.? तो सर्व सुमारे ५ लाखांहून अधिक पैसा अखेर कुणाकडे गेला.? की हे साकोलीचे व्यापारी संकुल एक "पैसे लुटण्याचे" साधन होते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
सध्या साकोली सेंदूरवाफा शहरात बाहेरच्या धनदांडग्यांचे अतोनात अतिक्रमणे करून त्याला भाड्याने व विकण्याचा व्यवसाय धंदा सुरू आहे. याच गंभीर विषयी हा एक नविनच "व्यापारी संकुल साकोली" घोटाळ्याने जन्म घेतला आहे. आज जनता सोशल मिडियावर प्रतिक्रिया देत आहेत की, मुळ निवासींसोबत अशी फसवणूक केली जाते. दूसरीकडे अतिक्रमण माफीया सर्रासपणे शासकीय भूखंडावर पाच सहा एकाचेच अतिक्रमणे करून त्याचा व्यवसाय धंदा करीत काहींनी लाखो रूपयांत विकल्याची चर्चा सुरू आहे. व आता हा शासनाचाच गोरगरीब व्यापारी जनतेला "व्यापारी संकुल साकोली" नावावर व शासनाचे नाव पुढे करून एकप्रकारे ४२० फसवणूक तर केली नाही. याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी करण्याची व ते हजारो जनतेकडून ५०० रूपये प्रमाणे वसुली करणारे कोण कोण.? हे सत्य जनतेसमोर आणने गरजेचे आहे. व अश्या फसवणुकीबाजांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
0 Response to "साकोलीत "व्यापारी संकुल" घोटाळा.? "
एक टिप्पणी भेजें