देवेंद्र दमाहे यांची गंभीर प्रतिक्रिया, जीविताला धोका असल्याचा दावा?
शनिवार, 9 अगस्त 2025
Comment
कुलदीप गंधे
"साप्ताहिक जनता की आवाज"
गोंदिया :- गोरेगाव तालुक्यातील भडंगा गावात काही दिवसांपूर्वी शेतीसाठी डायरेक्ट लाईनद्वारे वीज चोरी होत असल्याची बातमी प्रसारित झाली. बातमीचा उद्देश स्पष्टपणे अवैध वीज चोरी थांबवणे आणि प्रशासनाला जागृत करणे हा होता. मात्र, या बातमीच्या निमित्ताने गावात राजकारणाचे वारे जोर धरू लागले असून, दैनिक स्वराज्य दूत चे जिल्हा प्रतिनिधी व प्रेस संपादक पत्रकार संघाचे जिल्हा युवक अध्यक्ष देवेंद्र दमाहे यांनी स्वतःविरुद्ध सुरू झालेल्या बदनामीच्या मोहिमेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
दमाहे यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका अर्जात त्यांच्या घराचे वीज बिल न भरल्यामुळे पुरवठा खंडित झाला, असा आरोप करण्यात आला. "मी नियमितपणे वीज बिल भरतो, माझा पुरवठा खंडित झालाच नाही. तसेच, मी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध महावितरण कार्यालयात लेखी किंवा मौखिक तक्रारही दिलेली नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, गावातील काही व्यक्तींनी जाणूनबुजून अफवा पसरवून आणि खोटी माहिती अर्जात नमूद करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव रचला. "बातमीमध्ये
कुणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता. उद्देश फक्त इतकाच होता की, ज्या लोकांकडे वीज मीटर नाही आणि जे डायरेक्ट लाईनने वीज चोरी करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी," असे दमाहे यांनी सांगितले. गावातील काही नागरिकांनी अर्जावर सही केली असली, तरी त्यांना अर्जातील मजकूर समजावून सांगितला गेला नव्हता, असा दावा त्यांनी केला. "सौरऊर्जा किंवा वैध कनेक्शन असलेल्यांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, अवैध पद्धतीने वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे," असे दमाहे यांनी नमूद केले. या प्रकरणात आणखी गंभीर बाब मांडताना दमाहे म्हणाले, "गावातील काही व्यक्तींपासून माझ्या आणि माझ्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. मी समाजातील अन्याय, अत्याचार आणि गैरप्रकार उघड करण्याचे कार्य करत आलो आहे. त्यामुळे काहीजणांना हे पटत नाही. वीज चोरीबाबतची ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काहींनी माझ्या विरोधात अर्ज करून आमसभेत हा विषय चर्चेसाठी आणण्याचा डाव रचला आहे."
त्यांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की, त्यांना व त्यांच्या कुटुंबाला तात्काळ सुरक्षा पुरवावी. "माझ्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप जर सिद्ध केले गेले नाहीत, तर मी न्यायालयीन कारवाई करून मानहानीचा दावा दाखल करणार आहे," असा ठाम इशारा दमाहे यांनी दिला. "पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे. आमचे काम म्हणजे घडणारे सत्य, अन्याय आणि गैरप्रकार जनतेसमोर व प्रशासनासमोर मांडणे. ही बातमी कोणाला लक्ष्य करण्यासाठी नव्हती, तर वीज चोरी थांबवण्यासाठी होती. जर आज पत्रकारावरच अशा प्रकारचे राजकीय डावपेच खेळले जात असतील, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे." असे दमाहे यांनी स्पष्ट केले. भडंगा गावापुरतेच नव्हे, तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात अवैध पद्धतीने वीज चोरी होत असल्याच्या घटनांवर महावितरण विभागाने ठोस कारवाई करावी, अशी दमाहे यांची मागणी आहे. ही घटना केवळ एका गावातील वीज चोरीची बाब नसून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधोरेखित करते. पुढील काळात या प्रकरणात पोलीस व प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Response to "देवेंद्र दमाहे यांची गंभीर प्रतिक्रिया, जीविताला धोका असल्याचा दावा?"
एक टिप्पणी भेजें