संविधान दिनानिमित्ताने विशेष प्रेरणादायी लेख.....
शनिवार, 29 नवंबर 2025
Comment
संविधान:- देशाचा प्राण आणि जनतेचा विश्वास.
संकलन संग्रहक
संजीव भांबोरे हर्षवर्धन देशभ्रतार
जनतेच्या विश्वासाचा हा अढळ आधार,
समतेच्या प्रकाशात उजळतो संसार,
हक्क - कर्तव्यांचा देतो नवा विचार, भारतीय संविधान - आपला स्वाभिमान आणि प्राण!
“संविधान हे केवळ कागदावर लिहिलेलं नाही…
ते आपल्या पूर्वजांच्या रक्त, अश्रू आणि स्वप्नांनी लिहिलेलं आहे.”
भारताचे संविधान म्हणजे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात घेतलेलं एक पेन नव्हतं,
ते गोदामात काम करणाऱ्या मजुराचे घाम होतं,शाळेच्या दारात अडवलेल्या मुलीची आस होती,
आफत घालणाऱ्या जातिभेदाचा बंध तोडण्याची हिम्मत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर — स्वाभिमानाचे जखमी पंख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहीत होते तेव्हा त्यांच्या शाईत फक्त ज्ञान नव्हतं,
दुःखाची राख, संघर्षाचा धूर आणि लाखो पिढ्यांची वेदना मिसळलेली होती.
त्यांनी फक्त संविधान लिहिलं नाही—त्यांनी जनतेला उभं केलं.
दलित असो, गरीब असो, स्त्री असो… कुणालाही “मी कोणी नाही” असं म्हणावं लागू नये,
यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पेटवून टाकलं.
शिवराय — स्वराज्याने शिकवलं लोकशाहीचं धैर्य
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनावर बसून राज्य केलं नाही,
ते जनतेच्या हृदयात शिरून राज्य केलं.
त्यांचं स्वराज्य—भयमुक्त, न्यायपूर्ण व प्रजास्वामीक—
आज संविधानात रूपांतरित झालं.
शासन म्हणजे “आम्ही” नव्हे—“आपण सर्व” हा त्यांचा मंत्र होता.
संविधान आजही आपणास सांगते, “सत्तेत बसून राज्य करू नका… माणसांच्या जिवाशी राज्य करा.”
फुले — शिक्षणाचा दीप ज्यात प्रकाश होता, भिंती नव्हत्या
महात्मा जोतिबा फुले म्हणाले,
“जिथे ज्ञान नाही, तिथे माणूस नाही.”
त्यांनी लिहिलं नाही, त्यांनी तोडलं;
भेदभावाचे दरवाजे, अंधश्रद्धेची भिंत,
आणि शिक्षणावर बसलेली शतकांची धूळ.
क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी पहिल्या मुलीला पाटी दिली,
तेव्हा त्यांनी फक्त हातात खडू दिला नाही…
तिच्या हृदयात ‘मीही सक्षम आहे’ हा सूर्य ठेवला.
आज संविधानातील समानतेची ओळ त्या मुलीच्या डोळ्यातून जन्मते.
शाहू महाराज — सामाजिक न्यायाच्या हातात आश्रू पुसणारा हात
ते राजे नव्हते… ते आईसारखे राजा होते.
दलित, बहुजन, शेतकरी, कामगार—
ज्यांचे पाय थकले, ज्यांच्या पोटात भूक,
ज्यांच्या डोळ्यांत भीती—
त्यांच्या हाताला धरून “तुम्हाला हक्क आहे!” असं त्यांनी सांगितलं.
आज आपल्याला वाटतं आरक्षण म्हणजे संख्या—
पण शाहू महाराजांचे आरक्षण म्हणजे “मनुष्य असण्याचा अधिकार.”
भगतसिंग — फाशीच्या दोरीवर झुलणारी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा
भगतसिंगांनी हसू फेसावर ठेवून मृत्यूला सामोरे गेले.
त्यांना भारत केवळ साखळ्या तोडून मिळावा अशी इच्छा नव्हती,
त्यांना भारत मानवतेला सांभाळणारा हवा होता.
आज आपण बोलतो विचारस्वातंत्र्याबद्दल—
ते संविधानातील कलम नाही; ते भगतसिंगांचा श्वास आहे.
अण्णाभाऊ साठे — तळागाळाचा आवाज
त्यांच्या गाण्यांत डमरू वाजत नव्हता,
शोषितांचा आक्रोश वाजत होता.
त्यांनी सांगितलं— “कामगाराच्या हातात देशाची पूंजी आहे.”
संविधानातील निर्देशात्मक तत्त्वे,
जे शासनाला गरीब, वंचित, श्रमिकांच्या बाजूने उभे राहण्यास बाध्य करतात,
ती अण्णाभाऊंच्या कथांतील विणकर माणसाच्या उरातील हुंकार आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर — न्याय, मातृत्व आणि शांततेचा स्पर्श
शासन म्हणजे तलवार नाही…
अश्रू पुसणारी ओंजळ आहे, हे त्यांनी दाखवले.
धर्मनिरपेक्षता, सेवा, प्रशासनातील सन्मान…
त्यांनी लोकांना “ओळख” दिली नाही—“आश्रय” दिला.
संविधानातील कल्याणकारी राज्याच्या विचारात
त्यांचा आशीर्वाद दिसतो.
राष्ट्रसंत तुकोबाराया, संत जगनाडे महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा — माणूस माणसात पाहणारे
जिथे मंदिर-धर्म-प्रांत यांचे भेद होते,
तेथे त्यांनी एकच शिकवण दिली—
“माणुसकी हेच परमधर्म.”
गाडगे महाराजांनी झाडू उचलला,
तेव्हा ते रस्ते साफ करत नव्हते…
मनातील अहंकार, घाणेरड्या जातभावना साफ करत होते.
संविधानातील बंधुभाव म्हणजे
त्यांच्या त्या झाडूतील सन्मान.
संविधान — देशाचा प्राण, जनतेचा श्वास
संविधान हे आपल्याला मिळालेली भेट नाही—
ते कष्टाने, बलिदानाने, अश्रूंनी मिळवलेलं स्वातंत्र्याचं शोधन आहे.
त्यातील प्रत्येक शब्द म्हणतो:
“या देशात कोणताही माणूस लहान नाही.”
शासनासाठी संविधान—दंड नाही, अवलंब आहे.
प्रशासनासाठी संविधान—धोरण नाही, विवेक आहे.
समाजासाठी संविधान—कायद्याची भीती नाही, मानवी प्रतिष्ठेचा पाया आहे.
संविधान दिनाच्या निमित्ताने
“जिथे स्वाभिमान वाचतो,
जिथे मानवी हक्क जपले जातात,
जिथे सर्वात दुर्बलाच्या चेहऱ्यावर हसू फुलते—
तेथेच भारत जिवंत आहे.”
चला, संविधानाच्या पानांवर जगूया,
आपल्या वर्तनात त्याची तत्त्वे उतरवूया…
कारण संविधान केवळ देश चालवत नाही—
ते आपल्याला मानव बनवतं.
सरतेशेवटी असं म्हणावसं वाटते की,
तिरंगे की शान में जो कसम हम उठाते हैं,
संविधान की राह पर चलकर ही घर बसाते है,
न्याय -समता का वचन हमें आगे बढ़ना सिखाता,
भारत का नागरिक बनकर हर फर्ज निभाते हैं!
जय भारत, जय संविधान !..
राहूल डोंगरे
शिवाजी नगर तुमसर.
मो. न.9423413826
0 Response to "संविधान दिनानिमित्ताने विशेष प्रेरणादायी लेख....."
एक टिप्पणी भेजें