प्रहार नेत्याने केली वैद्यकीय अधीक्षकास दहा लाखाची मागणी.
मंगलवार, 2 दिसंबर 2025
Comment
• लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज़"
लाखांदूर :- येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.२० वाजता काही व्यक्ती रुग्णालयात येऊन अधिकारी कार्यरत असताना त्यांनी वाद घालत शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. रुग्णालय पेटवून देण्याचा इशाराही दिल्याचा गंभीर आरोप तक्रारकर्त्या वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे. दरम्यान, रुग्णालयासमोर २५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या एका नागरिकाच्या उपोषणाचा विषय काढत, उपोषण सोडविण्यासाठी आर्थिक व्यवहाराची मागणी करण्यात आल्याचेही वैद्यकीय अधीक्षकांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत विविध मोबाईल कॉल्सद्वारे मध्यस्थीच्या नावाखाली १० लाख रुपयांची मागणी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची मोबाईल क्लिप देखील उपलब्ध असल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षकांनी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत केला.
२८ नोव्हेंबर रोजीही याच प्रकरणी पुन्हा संपर्क साधून प्रत्यक्ष भेटून ‘तोडगा काढण्याचे’ प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपोषण सोडवून घेण्यासाठी पैशांची अवैध मागणी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे.
वैद्यकीय अधीक्षकांनी शासकीय कार्यात व्यत्यय आणणे, शिवीगाळ, धमकी तसेच पैशांची मागणी याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाने लाखांदूर परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
0 Response to "प्रहार नेत्याने केली वैद्यकीय अधीक्षकास दहा लाखाची मागणी."
एक टिप्पणी भेजें