माणूसपण हरवत चाललेल्या नात्याचे अधोरेखन करणारे नाटक- 'बाप रे बाप' -प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे लाखनी.
शनिवार, 10 जनवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- जागतिकीकरणाच्या या काळात भारतीय संस्कृतीत आमुलाग्र स्वरूपाचे बदल जाणवू लागले आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती आता नावापुरती शिल्लक राहिलेली आहे. भौतिक सुखासाठी तरुण पिढी आपल्या कुटुंबाचे शोषण करू लागली आहे.भारतीय लोकांचे जीवनमान विलक्षण गतीने बदलू लागले आहे. खानपान राहणीमान आणि उच्चभ्रू व्यवस्थेशी बरोबरी करण्यातून असंख्य सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न अनेक प्राणी गिळून सुस्तावलेल्या महाकाय अजगरासारखे फुगत चालले आहेत.जगण्याची अर्थपूर्णताच माणूस हरवून बसला आहे. दिखाऊ बेगडी प्रवृत्तींची प्रचंड उलाढाल सोन्याच्या किमती सारखी भयंकर वाढताना दिसत आहे अशा पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि रंगकर्मी प्रा. सदानंद बोरकर यांचे' बाप रे बाप 'हे नाटक प्रत्येक कुटुंबांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे वाटते. श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगाव यांची 'बाप रे बाप 'ही अप्रतिम कलाकृती सन्मित्र नाट्यमंडळ यांच्या सौजन्याने जवळून अनुभवण्याचा लाखनीमध्ये सुयोग आला.' आत्महत्या', 'माझं कुंकू मीच पुसलं',' नवरे झाले बावरे ', 'गंगा जमुना' आणि' बाप रे बाप 'अशा दहा सामाजिक विषयांवरील नाटकातून प्रा.सदानंद बोरकर यांनी रसिकांच्या हृदयावर आणि काळजावर आपले नाव कोरले आहे.आशय- विषयाची जबरदस्त मांडणी, वर्तमानकालीन प्रश्नांचे भावगम्य सादरीकरण, कसदार दमदार अभिनयाच्या पात्रांचे एकत्रीकरण, प्रभावी संवाद आणि उच्च कोटीच्या विनोदाचे उपयोजन,समुचित संगीत,गीत, नृत्य संयोजन, पार्श्वगायन आणि नेपथ्याचा थाट,छाया, प्रकाश,ध्वनी योजनेचे तथा रंगमंच निर्मितीचे, वेशभूषा रंगभूषा अशा सर्वच बाबींचे अप्रतिम समावेशन अशा साऱ्या बाबींच्या एकत्रीकरणाच्या मेळातून अत्यंत दर्जेदार कलाकृती रंगभूमीवरून प्रस्तुत करण्याचा प्रा. सदानंद बोरकर यांनाप्रचंड अनुभव आहे लाखनी येथे दि. 27 डिसेंबर 2025 रोजी या बाबीचा प्रत्येय 'बाप रे बाप' मध्ये पहावयास मिळाला.
' बाप रे बाप'- या नाटकाविषयी
-------------------------------
या नाटकात प्रसाद सातपुतेंचे एक भन्नाट कुटुंब पहावयास मिळते.कुटुंबात प्रचंड दुःख असूनही हसतखेळत जीवन जगणारे शासकीय नोकरीतील मध्यमवर्गीय प्रसाद सातपुते पहिली पत्नी प्रभा मरण पावल्यानंतर दुसरं लग्न करतात.वत्सला नावाची अवदसा त्यांच्या जीवनात येते आणि दुःखाच्या तीव्रतेत भर पडत जाते मात्र हसतमुखाने दुःखाच्या डोंगराला पेलण्याचे सामर्थ्य असणारा प्रसाद आपल्यासकट इतरांनाही सुखाचाच प्रसाद वाटण्याचा कायम प्रयत्न करीत असतो. प्रभा नावाच्या पहिल्या पत्नीचा मुलगा प्रकाश आणि त्याची पत्नी रमा दोघेही सुसंस्कारित,समंजस, शालीन आणि सुस्वभावी तर दुसऱ्या बायकोचा, वत्सलाचा मुलगा इंद्रनील हा स्वार्थी, बेरोजगार, उनाड आणि संस्कारहीन अगदी वच्छलीचेच डीएनए घेऊन जन्मलेला! सावत्रपणातून घरात रोज निर्माण होणारे पराकोटीचे भांडण याही नाटकात पाहावयास मिळते मात्र ते हलक्यात घेत सहनशीलतेचा परिचय देत प्रसाद सातपुते विनोद करीत हसतखेळत कुटुंबाचा गाडा पुढे ढकलत ढकलत नेतात. सतत प्रेक्षकांना हसवत ठेवणं, गंभीर विषय मांडूनही रसिकांना खेळवत ठेवणं हे अवघड काम पेलण्याचं सामर्थ्य या लेखकामध्ये आहे. घरात वत्सलाची लहान बहीण बबली अत्यंत खट्याळ आणि बावळट असणारी,एकप्रकारे दत्तक म्हणूनच सातपुते यांच्या घरात राहते. ती अविवाहित असून बहीण आणि बहीणलेकाच्या चक्रव्युहात अडकून राहते.डॉ. सुळे हे सातपुते यांचे खास जिवलग मित्र तर बबलू हा त्यांचा पहिल्या बायकोच्या नात्यातला आतेभाऊ, हे दोघेही सातपुतेंवर विलक्षण प्रेम करणारे!डॉ.सूळ्याचेच प्रभाबरोबर लग्न होणार असते परंतु सरकारी नोकरी नाही म्हणून प्रसादच्या गळ्यात प्रभाची वरमाला पडते परंतु डॉ. सूळ्याच्या मनात प्रभाबद्दलचा कायम आदर राहतो.सातपुते तर प्रभावरून डॉ.सूळ्याची सतत गंमत करीत राहतो. इंद्रनील काही कामधंदा करीत नाही परंतु ठाकरेंच्या सोनी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला तिच्याशी विवाह करायचा असतो मात्र नोकरी, पैसा नसण्यातूनआणि सरकारी नोकरी प्राप्त करण्याच्या अभिलाषेतून एक भन्नाट कल्पना इंद्रनीलच्या मनात येते. आपला बाप मरावा आणि अनुकंपातून त्याला नोकरी मिळावी ही ती जीवघेणी कल्पना तो आपल्या आईला सांगतो. मावशीलाही सांगतो आणि मग ते तिघेही भयानक कट रचतात परंतु नंतर या गटात बबली नसते.ती आपल्या दाजीला त्या कटाची कल्पना देते.आतड्याचा कॅन्सर झाल्याचे सातपुते डॉ.सुळे,बबलू यांच्या मदतीने नाटक रचतात.रसिकांना याची काहीही कल्पना नसते. बबलीही त्यांना साथ देते परंतु तिचे डाव शेवटपर्यंत रसिकांना कळत नाहीत.वाढदिवसाच्या दिवशी इंद्रनील आपल्या बापाला विष असलेला चॉकलेट देतो.त्यांना रक्ताची उलटी येते.लगेच दवाखान्यात त्यांना नेलं जातं. ते त्यातून बरे होतात इंद्रनीलाला पश्चाताप होतो तो आपल्या आईला यासाठी जबाबदार धरतो तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न करतो परंतु प्रकाश आपल्या आईला वाचवतो पोलीस तपासात सातपुते कुटुंबाला
सहीसलामत ठेवतो.
कधी गंभीर तर कधी हसतखेळत वळण घेत रसिकांना मंत्रमुग्ध करणारे he नाटक विलक्षण भावस्पर्शी असून अनुकंपावर बापाची नोकरी लागावी म्हणून बापाचा जीव घेण्याची लालसा अधोरेखित करणारं हे नाटक समाजातील कुटुंब व्यवस्थेतील बेगडी प्रवृत्तींचा समाचार घेणारं असं आहे. नाटकात त्यांच्या घरातील नोकर चमन याचे विनोदी पात्र पाहावयास मिळते मात्र त्याची भूमिका फारच छोटी आहॆ. शेवट सुखावह होतो.बबलू आणि बबली यांना सातपुते लग्नाच्या बेडीत अडकवतात. सतत तीन तास प्रेक्षक रसिकांना खेळवून ठेवण्यात हे नाटक यशस्वी झालं आहे. सतत रसिकांच्या ओठी 'बाप रे बाप' हे विस्मयजनक वाक्ये येत राहतं.खळखळून हसवणारे भन्नाट निखालस विनोद, साधी,सोपी भाषा मर्मस्पर्शी संवाद, अतिशयोक्तीचा अभाव, रसपूर्ण सौंदर्यवेधकशैली, रसिकांना तन्मय करण्याची ताकद असणारे कथानक, त्याचे उत्कृष्ट सादरीकरण
कर्णमधुर संगीत, प्रसादपूर्ण शीर्षक गीत,आतील गीते, खटकेबाज संवाद, ठसठशीत व्यक्तिचित्रे,कसदार अभिनय, हृदयाला हात घालणारे त्यातील करूण प्रसंग, लालीत्यपूर्ण शब्दयोजना,
खेळकर आणि खोडकर पात्रांचे स्वभाववैशिष्ट्ये अशा अनेक गोष्टींमुळे 'बाप रे बाप' प्रत्येकच रसिकांच्या ओठावर नाटकभर रेंगाळत राहिले. प्रा. सदानंद बोरकर,पूजा पिंपळकर,कमलाकर कामडी, आसावरी रामेकर, देवयानी जोशी,अजीज पाशा, कौशल जोशी,पराग सहारे आणि राहुल बोरकर यांच्या दमदार अभिनयाने 'बाप रे बाप' लाखनीवासीयांच्या हृदयावर कायम ठसा उमटवून गेले.
सर्व कलावंत आणि तांत्रिक सहायकांना मनापासून शुभेच्छा.
-------------------------------------
प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे
लाखनी जि. भंडारा
9373711432
-------------------------------------
0 Response to "माणूसपण हरवत चाललेल्या नात्याचे अधोरेखन करणारे नाटक- 'बाप रे बाप' -प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे लाखनी."
एक टिप्पणी भेजें