मेहेगाव येथे तरुणाची धारदार शस्त्राने निघृण हत्या.
शनिवार, 24 जनवरी 2026
Comment
• अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.
• पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरली.
• मेहेगावात पोलीस छावणीचे स्वरूप.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- तालुक्यातील मेहेगाव येथे एका २८ वर्षीय तरुणाची अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल गणेश राणे (वय २८, रा. मेहेगाव) असे मृतकाचे नाव आहे. कपिल हा २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून ते २३ जानेवारी रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या दरम्यान मेहेगावपासून सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या उत्तर दिशेकडील परिसरात होता. या काळात अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कारणावरून कपिलवर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, कपाळावर आणि कुशीवर सपासप वार करून
त्याला जागीच ठार मारले. या प्रकरणी मृतकचा मोठा भाऊ पंकज गणेश राणे (वय ३३, रा. मेहेगाव) यांनी तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून आणि पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार, अज्ञात आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३३/२०२६, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम हे करत आहेत. भरदिवसा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे मेहेगाव परिसरात शोककळा पसरली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.
मेहेगावात पोलीस छावणीचे स्वरूप
घटनेनंतर गावात निर्माण झालेला तणाव पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'कपिलच्या मारेकऱ्यांचा छडा तातडीने लागावा,' अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होते आणि मुख्य आरोपी कधी गजाआड होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Response to "मेहेगाव येथे तरुणाची धारदार शस्त्राने निघृण हत्या."
एक टिप्पणी भेजें