वृक्षरोप देऊन संक्रातीचे वाण वाटप.
रविवार, 18 जनवरी 2026
Comment
• जिजाऊ ब्रिगेडच्या शितल भुसारी यांचा महिलांना प्रेरणादायी संदेश.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- मकर संक्रांतीचा सण म्हणजे जसे गोड - धोड करून खाणे आणि इतरांना पण गोड भरून मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणे. तसेच मकर संक्रांतीचा सण हा महिलांच्या गाठीभेटी घेणे, हळदीकुंकवाच्या माध्यमातून विचारांची आणि वस्तूंची देवाण-घेवाण करणे अशी परंपरा आहे; परंतु या परंपरेला परिवर्तन करत जवळपास 2009 पासून महाराष्ट्र हायस्कूल सिहोरा येथील शिक्षिका आणि जिजाऊ ब्रिगेड तुमसरच्या कार्यकर्त्या शितल अनिल भुसारी हे संक्रातीनिमित्त वस्तूरुपी वाण देण्याऐवजी विचारांची देवाण - घेवाण व्हावी हा उद्देश ठेवून ते महिलांना ग्रंथ भेट देऊन विचारांचे वाण वाटत होते. यावर्षीच्या वाणामध्ये त्यांनी बदल करत संत तुकाराम महाराजांचा "वृक्षवल्ली आम्हा सोयरे, सदा वनचरे" हा संदेश घेऊन महिलांना वृक्षरोप देऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात शीतल भुसारी यांनी सांगितले की, काही वेगळं किंवा नवं करावं म्हणून वृक्षरोप किंवा ग्रंथ वाटप करत नाही तर काळानुसार माणसाने बदलत राहणं आवश्यक आहे. गरजा लक्षात घेऊन आम्ही परिवर्तनाचा विचार स्वीकारून प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन अंगीकारणे आवश्यक आहे. मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडने हा जो सांगितलेला आचार - विचार आहे त्यामुळे हा छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्रतील मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी समाजाला परिवर्तनाची दिशा देणाऱ्या गोष्टी करत असतात. ती प्रथा शितल भुसारी यांनी कायम ठेवलेली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन.
काळानुसार प्रथा परंपरा बदलून समाजाला दिशा देणाऱ्या नवीन प्रथा परंपरा आजची स्त्री निर्माण करू शकल्या तर खऱ्या अर्थाने जिजाऊ, सावित्री, अहिल्याराणी होळकर, रमाईचा विचार समाजात रुजेल आणि सृजनशील पिढी निर्माण होईल. तसेच पर्यावरणाचे संरक्षण करता येईल. शितल भुसारी यांनी सुरू केलेल्या या नव्या वैचारिकरुपी प्रथेचा स्वीकार आजच्या महिलांनी करणे गरजेचे आहे.
0 Response to "वृक्षरोप देऊन संक्रातीचे वाण वाटप."
एक टिप्पणी भेजें