लोकाभिमुख व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख;
शनिवार, 31 जनवरी 2026
Comment
• तहसीलदार उपेश अंबादे यांच्या कार्यशैलीचा ठसा.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- तुमसर तहसील व उपविभागीय महसूल कार्यालयात सध्या शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देणारे प्रशासन अनुभवायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वी तहसीलदार म्हणून रुजू झालेले श्री. उपेश अंबादे यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि कायदेशीर चौकटीत काम करणाऱ्या कार्यशैलीमुळे महसूल प्रशासनाला नवी दिशा मिळाली आहे.
तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारताच श्री. उपेश अंबादे यांच्याकडे उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) तुमसर यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. नव्याने रुजू होऊनही त्यांनी जबाबदाऱ्यांपासून मागे न हटता प्रशासन अधिक गतिमान करण्यावर भर दिला. शासकीय वेळेच्या पलीकडे जाऊन, सुट्टीच्या दिवशीही स्वतः कार्यालयात उपस्थित राहून त्यांनी अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली.
महसूल विभागात प्रामाणिक, शिस्तप्रिय व कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेल्या श्री. उपेश अंबादे यांनी बैठका, क्षेत्रदौरे, निवडणूकसंबंधित कामे अशा विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळत तहसील व उपविभागीय कार्यालयातील कामकाज नियमित केले. त्यांच्या उपस्थितीचा थेट परिणाम म्हणजे अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित राहू लागले असून नागरिकांची रखडलेली कामे वेगाने निकाली निघत आहेत.
नागरिक व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या Farmer ID संदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा त्यांनी प्राधान्याने निपटारा केला. तसेच आवश्यक अॅफिडेव्हिट प्रक्रिया ऑनलाईन केल्याने तहसील कार्यालयातील गर्दी कमी होऊन नागरिकांचा वेळ व श्रम वाचले आहेत.
अवैध रेती वाहतुकीविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेत ठोस कारवाई केली. वरठी येथे १७ टिप्पर व आधलगाव येथे ५ टिप्परवर केलेल्या कारवाईमुळे अवैध रेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळाले आहे. त्याचबरोबर गरीब घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत रेती वाटपाचे नियोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे.
अनेक वर्षांनंतर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमसरकरांना विविध शाळांतील देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाली. या भव्य कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन व जनतेतील संवाद अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
श्री. उपेश अंबादे यांच्या सक्रिय, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनामुळे तुमसरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आता निश्चितच मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत असून, या प्रयत्नांत तहसीलदार श्री. उपेश अंबादे यशस्वी ठरतील, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.
0 Response to "लोकाभिमुख व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख;"
एक टिप्पणी भेजें