शासकीय जयंती यादीत संत तुकाराम महाराजांचे नाव वगळले २०२६ च्या अधिकृत यादीत समावेशाची मागणी :- कुणबी समाज संघटनेचे निवेदन.
शुक्रवार, 9 जनवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज".
मोहाडी :- महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अपमान होत असल्याचा आरोप करत मोहाडी तालुका कुणबी समाज संघटनेने संताप व्यक्त केला आहे. सन २०२६ च्या शासकीय जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांच्या अधिकृत यादीतून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव वगळल्याने असंतोषाची भावना व्यक्त करण्यात आली. अन्यायाविरोधात संत तुकाराम महाराजांच्या जयंतीचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी मोहाडी तालुका कुणबी समाज संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सन २०२६ मध्ये शासकीय पातळीवर साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती व संत यांच्या जयंती व पुण्यतिथींची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध क्षेत्रांतील एकूण ४५ थोर व्यक्तींचा समावेश करण्यात आला असून, शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह मानला जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि अभंगवाणीतून मानवता, समता व बंधुतेचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव या यादीतून वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मोहाडी तालुका कुणबी समाज संघटनेच्या वतीने मोहाडी तहसीलदार विमल थोटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात संत तुकाराम महाराजांचे सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक योगदान अतुलनीय असून, त्यांच्या विचारांनी समाजाला योग्य दिशा दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा महान संताच्या जयंतीचा शासकीय यादीत समावेश होणे हे शासनाचे नैतिक कर्तव्य असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच, दिनांक २९ डिसेंबर २०२५ च्या परिपत्रकात तातडीने सुधारणा करून सन २०२६ च्या शासकीय जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांच्या अधिकृत यादीत संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीचा समावेश करावा अशी मागणी मोहाडी तालुका कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. आशिष माटे, सचिव मोरेश्वर सार्वे, राजू बांते, पराग आगाशे, सदाशिव ढेंगे, मुरलीधर कानेटकर, गोपाल बुरडे, शुभम सिंगनजुडे व विलास आथिलकर आदींनी केली.
0 Response to "शासकीय जयंती यादीत संत तुकाराम महाराजांचे नाव वगळले २०२६ च्या अधिकृत यादीत समावेशाची मागणी :- कुणबी समाज संघटनेचे निवेदन."
एक टिप्पणी भेजें