धान खरेदी केंद्रांवरील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आळा घालण्यासाठी आमदार रामदास मसराम यांची पुढाकाराने बैठक.
शुक्रवार, 9 जनवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
गडचिरोली :- आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, खरेदी प्रक्रियेत होणारी आर्थिक लूट तसेच अवैधरित्या पावत्या फाडण्यासारख्या गंभीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी आज सर्किट हाऊस येथे आमदार रामदास मसराम यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी (DMO), प्रादेशिक मार्केटिंग अधिकारी (RMO) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अनेक आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आमदार रामदास मसराम यांच्याकडे मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. काही केंद्रांवर वजनात कपात, नियमबाह्य पद्धतीने पैसे उकळणे, शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणे तसेच अवैधरित्या पावत्या फाडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदर बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीदरम्यान आमदार रामदास मसराम यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावले की, शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. आधारभूत धान खरेदी केंद्रांवर संपूर्ण पारदर्शकता ठेवणे, शेतकऱ्यांचे धान योग्य दराने व वेळेत खरेदी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. खरेदी केंद्रावर येणाऱ्या अडचणी, धानाची मोजणी, दर्जा तपासणी, ऑनलाईन नोंदणी, पावती देण्याची प्रक्रिया तसेच वेळेवर पैसे न मिळणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच, खरेदी केंद्रांवर होत असलेल्या आर्थिक लुटीवर तात्काळ अळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश आमदारांनी दिले. अवैधरित्या पावती फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे, दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. प्रत्येक खरेदी केंद्रावर नियमित तपासणी पथक नेमण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय, शेतकऱ्यांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास थेट प्रशासनाकडे तक्रार करता येईल, अशी व्यवस्था उभारण्यावरही चर्चा झाली.
बैठकीअंती अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे आधारभूत धान खरेदी केंद्रांवरील गैरप्रकारांना आळा बसेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार रामदास मसराम यांनी व्यक्त केला.
0 Response to "धान खरेदी केंद्रांवरील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आळा घालण्यासाठी आमदार रामदास मसराम यांची पुढाकाराने बैठक."
एक टिप्पणी भेजें