माईंचे स्मरण म्हणजे क्रांतीची प्रेरणा!. – डॉ. देवानंद बि. नंदागवळी.
शनिवार, 7 फ़रवरी 2026
Comment
संकलन / संग्रहक : हर्षवर्धन देशभ्रतार
७ फेब्रुवारी हा दिवस केवळ पूज्य माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचा नसून, त्याग, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यामागे शांतपणे, संयमाने आणि अढळ विश्वासाने उभे राहून त्यांच्या ध्येयाला बळ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रज्ञासूर्याची सावली, बहुजनांची माऊली, त्याग, संघर्ष आणि ममत्वाची मूर्ती माता रमाई.
संविधान केवळ पुस्तकात नसते; ते जिवंत राहते ते नागरिकांच्या विचारात, धैर्यात आणि कृतीत. त्या विचारांच्या पायाभरणीत रमाईंचा निःशब्द त्याग सामावलेला आहे. बाबासाहेबांनी समाजाला न्याय, समता आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला; पण त्या मार्गावर चालण्याची ताकद त्यांना देणारी सावली म्हणजे रमाई होत्या.
रमाईंचे जीवन हे केवळ एका स्त्रीचे चरित्र नाही; ते भारतीय समाजाच्या वेदनांचे, स्त्रीजीवनातील अन्यायाचे आणि परिवर्तनासाठी दिलेल्या महान त्यागाचे प्रतीक आहे. अत्यंत दारिद्र्य, उपासमार, मुलांचे मृत्यू, सामाजिक अपमान—या असंख्य संकटांना सामोरे जात असतानाही त्यांनी बाबासाहेबांच्या ध्येयावरचा विश्वास कधी ढळू दिला नाही. संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी कष्टाची पराकाष्ठा केली, काटकसरीने घर सांभाळले आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला.
एका आईसाठी आपल्या लेकरांना गमावणे हे जगातील सर्वात मोठे दु:ख असते; तरीही रमाईंनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. त्यांचा त्याग शांत होता, पण तो दुर्बल नव्हता—तो एका महान सामाजिक क्रांतीला आधार देणारा होता.
रमाबाईंच्या स्वभावात करुणा आणि माणुसकी ओतप्रोत भरलेली होती. वसतिगृहातील गरजू मुलांना अन्न मिळावे म्हणून स्वतःच्या हातातील बांगड्या देण्याची घटना त्यांच्या दयाळू हृदयाची साक्ष देते. म्हणूनच त्या सर्वांच्या “माता रमाई” बनल्या. त्यांच्या साधेपणात आत्मसन्मान होता. “माझा दागिना म्हणजे माझं कुंकू” या त्यांच्या शब्दांत त्याग, निष्ठा आणि स्वाभिमानाचा अद्भुत संगम दिसतो.
भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र वास्तव अजूनही वेगळे चित्र दाखवते. महिलांवरील अत्याचार, बालकांवरील हिंसा, कार्यस्थळी भेदभाव आणि घरगुती छळ या समस्या अजूनही समाजासमोर उभ्याच आहेत. त्यामुळे एक प्रश्न प्रत्येकाला स्वतःला विचारावा लागतो—संविधान लिहिले गेले, पण समाज खऱ्या अर्थाने घडला आहे का?
आज आपण प्रगतीचे मोजमाप तंत्रज्ञान, मोठ्या इमारती आणि पदांमध्ये करतो; परंतु समाजातील दुर्बल, महिला आणि पीडित व्यक्ती सुरक्षित नसतील, तर ही प्रगती अपुरीच ठरते. संविधानाचा सन्मान केवळ भाषणात नव्हे, तर आचरणात दिसला पाहिजे.
माता रमाईंचे स्मरण म्हणजे केवळ इतिहास आठवणे नव्हे, तर वर्तमानाला जागवणे आहे. त्यांच्या शांत त्यागाने एका महान क्रांतीला बळ दिले; आज त्याच प्रेरणेने आपण समाजात समता, सन्मान आणि न्यायाची ज्योत जिवंत ठेवण्याची गरज आहे. रमाईंच्या स्मृतीला खरी आदरांजली हीच—त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समता, शिक्षण आणि मानवतेचा मार्ग पुढे नेऊया आणि संविधानातील मूल्ये केवळ शब्दांत नव्हे, तर आपल्या विचारात, वर्तनात आणि कृतीत उतरवणे.
0 Response to "माईंचे स्मरण म्हणजे क्रांतीची प्रेरणा!. – डॉ. देवानंद बि. नंदागवळी."
एक टिप्पणी भेजें