मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे काय ?..
बुधवार, 18 फ़रवरी 2026
Comment
नागपूर
भ्रमणध्वनी : 9595255952
50 वर्षापूर्वी ‘मुस्लीम सत्यशोधक चळवळ’ म्हणून संस्था उदयास आली होती. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचे नाव आणि परंपरा याचा आधार घेऊन वावरु लागलेली ही पहिलीच चळवळ असेल ती म्हणजे उपरोक्त!
महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकांचे नाव धारण करुन चळवळ व संस्था सुरु करण्यात आली. त्यात गैर काहीच नाही. खरे म्हणजे ही एक अत्यंत उपयुक्त आणि स्फूर्तीदायक चळवळ ठरावी, अशी अपेक्षा उत्पन्न झाली. सनातनी रुढीग्रस्त मुस्लीम समाजामध्ये म्हणजेच स्त्री-पुरुष, शुद्र-अतिशुद्रांमध्ये ही चळवळ महात्मा फुल्यांची प्रेरणा-धारण आणि पोटतिडीक घेऊन जात असली. तरी ते महात्मा फुल्यांचे महाराष्ट्राचे आणि मुस्लीम समाजाचे महदभाग्यच ठरणार होते. स्वाभाविकपणेच या चळवळीचे प्रवर्तक व त्यांच्या धाडसाचे प्रथम कौतुकच झाले. त्यामुळे या त्यांच्या कार्याबाबतच्या अपेक्षाही उंचावल्या होत्या!
हिंदू सनातन्याविरुध्द जसा लढा झाला तसा आता मुस्लीम सनातन्यांविरुध्द मुस्लीम बहुजन समाजाचा - स्त्रिया आणि श्रमिक दलितांचा उठाव होणार अशी अपेक्षा उत्पन्न झाली. अशा प्रारंभीच्या पायाभरणीच्या चळवळीच्या व तिच्या प्रवर्तकांच्या नशिबी जी उपेक्षा येते, ती ही सुदैवाने मुस्लीम सत्यशोधकांच्या वाटयाला आली नाही. उलट साखळी वृत्तपत्रांतील अमाप दैनंदिन प्रसिध्दीच्या झगझ्गाटात ही चळवळ सुरु झाली त्यामुळे रत्यानंतर कधीच ओहोटी लागली नाही, ही जमेची बाजू!
चळवळीचे मुख्य प्रणेते आणि प्रवर्तक श्री हमीद दलवाई यांना वक्तृत्वाची आणि उत्साहाची नैसर्गिक देणगी लाभली असल्याने त्यांची झंझावाती प्रचार माेहीमही महाराष्ट्र भर चांगलीच गाजू लागली. जाहीर सभेप्रमाणे निवडक उच्चभ्रूंच्या बैठकीचाही भरपूर लाभ दलवाई ला झाला. शुध्द मराठीत बोलणारा आणि मुस्लीम जातीवादाचा सडेतोड दंभस्फोट करणारा पट्टीदार वक्ता म्हणून लवकरच दलवाईना अमाप लोकप्रियताही लाभली. विशेषत: तथाकथित राष्ट्रवादी व पुरोगामी मुस्लीम नेत्यांचा जो दंभस्फोट दलवाईंनी धडाक्याने चालविला होता, त्यामुळे काही मंडळी तर प्रारंभी अगदी बेहद खुष होऊन गेली होती.
या चळवळीला ज्याप्राणे प्रसिध्दीची कधी वाण पडली नाही. त्याचप्रमाणे साधन सामुग्रीचीही तूट भासली नाही. चळवळीने प्रथम जो प्रश्न हाती घेतला तो मुस्लीम स्त्रियांच्या गुलामगिरीचा त्यांच्या विवाहाचा म्हणजे मुस्लीम पुरुषाच्या चार बायका करण्याच्या हक्काचा, त्याचप्रमाणे हवा तेव्हा हवा तसा एकतर्फी ‘तलाक’ (घटस्फोट) देण्याच्या हक्काचा! थोडक्यात म्हणजे कुराणाच्या नावाने चाललेल्या एका महत्वाच्या अन्यायाविरुध्द तोही समाजातील अत्यंत दलित अशा स्त्रियांवरील घोर अन्यायाविरुध्द हा लढा होता. स्वाभाविकपणेच या आंदोलनाबद्दल गाढ सहानुभूती निर्माण होऊ लागली.
ज्यांच्यासाठी ती चळवळ उभारली, त्यांच्यापर्यंत ती कितपत पोचली ? ज्यांना तिचे आव्हान जाणवायला हवे होते. त्यांना ते किती जाणवले ? तिला पाठिंबा कोणाचा मिळाला? विरोध कोणाचा झाला? मुस्लीम जनमानसाच्या दृष्टीने. त्याचप्रमाणे एकुण जनतेच्या दृष्टीने आजतागायत कितपत प्रगती झाली ? एकूण पुरोगामी शक्तीच्या जमेच्या बाजूला काय पडले? प्रतिगाम्यांच्या हाती काय पडले? देशातील एकूण पुरोगामी धर्मनिरपेक्ष, सामाजिक, क्रांतीकारक चळवळीला तिच्या पुढे कितीसे बळ प्राप्त झाले? असे किती तरी प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. त्यामुळे चळवळीचे काय झाले? असा अनाकलनिय प्रश्न निर्माण होतो.
संकलन/संग्रहक
हर्षवर्धन देशभ्रतार
0 Response to "मुस्लीम सत्यशोधक चळवळीचे काय ?.. "
एक टिप्पणी भेजें