-->
कुंपणच शेत खातो, मुरमाडीत वीज कर्मचाऱ्याकडूनच वीज चोरी.

कुंपणच शेत खातो, मुरमाडीत वीज कर्मचाऱ्याकडूनच वीज चोरी.


नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
लाखनी :- मुरमाडी परिसरातील एका गावात शंकर पटाचे आयोझजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्युत यंत्रणेवर चालणाऱ्या पाळण्यांसाठी (झुल्यांसाठी) चक्क चोरटी वीज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही वीज चोरी खुद्द एका महावितरण कर्मचाऱ्यानेच करून दिली होती. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणाऱ्या स्थानिक पत्रकाराला आता संबंधित कर्मचाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली असून, परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावात आयोजित शंकर पटात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत होता. येथील झुल्यांसाठी महावितरणच्या मुख्य वाहिनीवरून थेट आकडे टाकून चोरटी वीज घेण्यात आली होती. एका सजग स्थानिक पत्रकाराने या गैरप्रकाराची माहिती महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाला दिली. माहिती मिळताच विभागाने चौकशी केली असता, ही वीज चोरी एका विद्युत कर्मचाऱ्याच्या मदतीनेच सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या गंभीर प्रकारामुळे संतापलेल्या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित दोषी कर्मचाऱ्याची जागीच कानउघडणी करत त्याला चोप दिल्याची चर्चा आहे. आपल्या कृत्याची शिक्षा मिळाल्याचा राग मनात धरून, संबंधित विद्युत कर्मचाऱ्याने थेट तक्रार करणाऱ्या पत्रकाराचे घर गाठले.

संबंधित कर्मचाऱ्याने पत्रकाराच्या घरी जाऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि "माझी तक्रार का केली?" असा जाब विचारत हुज्जत घातली. इतकेच नव्हे, तर 'तुला संपवून टाकीन' अशी जीवे मारण्याची धमकीही दिली. सार्वजनिक कामात पारदर्शकता आणणाऱ्या पत्रकारावर अशा प्रकारे हल्ला आणि धमकी दिल्याने पत्रकार वर्गात तीव्र पडसाद उमटत आहेत.

आपल्या जीवाला धोका असल्याचे ओळखून आणि कर्तव्यावर असताना झालेला हा अपमान सहन न झाल्याने, पीडित पत्रकार सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देणार आहेत. या प्रकरणी संबंधित दोषी कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. एकीकडे वीज चोरी रोखण्याचे आव्हान असताना, महावितरणचे कर्मचारीच अशा कृत्यात सहभागी असणे आणि माहिती देणाऱ्यांना धमकावणे हे गंभीर आहे.

0 Response to "कुंपणच शेत खातो, मुरमाडीत वीज कर्मचाऱ्याकडूनच वीज चोरी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article