सार्वजनिक शिवजयंतीवर राजकारणाचे सावट; शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी.
शनिवार, 28 फ़रवरी 2026
Comment
विजय चौडेकर
"सापताहीक जनता की आवाज"
नांदेड/नायगाव बाजार :- नायगाव शहरात सार्वजनिक शिवजयंतीच्या निमित्ताने सुरू असलेल्या घडामोडींवरून राजकीय वातावरण तापले असून, शिवप्रेमी नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या विचारांचा ध्यास घेणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव हा समाजप्रबोधनाचा आणि प्रेरणेचा सोहळा असावा; मात्र तो सध्या ‘राजकीय शक्तीप्रदर्शनाचा मंच’ बनत चालल्याचा आरोप पुढे येत आहे.
*सार्वजनिक की राजकीय शिवजयंती?*
नायगाव नगर पंचायतीतील सत्ताधारी गट व काही स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून साजरी होत असलेली शिवजयंती ही खऱ्या अर्थाने सार्वजनिक न राहता ‘राजकीय शिवजयंती’ ठरत असल्याची टीका होत आहे. शहरात लावण्यात आलेल्या पोस्टर, फलक आणि बॅनरवर शिवरायांची प्रतिमा दुय्यम ठरून संबंधित नेत्यांचीच मोठी छायाचित्रे झळकत असल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शिवरायांचा उत्सव की स्वतःच्या प्रतिमेचा उदो-उदो असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जयंतीच्या निमित्ताने समाजात ऐक्य, शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचे विचार रुजवण्याऐवजी स्वतःची जाहिरातबाजी करण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. नायगाव शहरांमध्ये एकही महामानवाने स्मारक न करता स्वतःच्या स्मारकाचा उदो उदो झाला आहे असे मत गजानन पाटील चव्हाण यांनी केले आहे
आमच्या तालुका प्रतिनिधीशी बोलत असताना गजानन पाटील चव्हाण यांनी सांगितले की नायगाव शहरांमध्ये सर्व महामानवाचे स्मारक अवघ्या काही महिन्यातच स्वखर्चातून उभारणी करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे
*विचारांचा अपमान?*
शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो इतिहासाची, प्रेरणेची आणि मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. अशा दिवशी राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मंच उभारणे, बॅनरबाजी करणे आणि वैयक्तिक प्रतिमा झळकावणे हे शिवरायांच्या विचारांशी विसंगत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शिवजयंतीच्या नावाखाली स्वतःचे फोटो झळकावून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने शिवरायांना अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, युवकांना प्रेरणा देणे आणि समाजहिताचे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मतही पुढे आले आहे.
*शिवप्रेमींचा निषेध*
या पार्श्वभूमीवर नायगावातील शिवप्रेमींनी गजानन पाटील चव्हाण यांच्यासह एकत्र येत अशा प्रकारच्या राजकीय शिवजयंतीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. सार्वजनिक शिवजयंती ही सर्वांची असते ती कोणत्याही पक्षाची किंवा व्यक्तीची खासगी मालमत्ता नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
नायगाव शहरात शिवजयंतीचा उत्सव भविष्यात अधिक शिस्तबद्ध, विचारप्रधान आणि खऱ्या अर्थाने ‘सार्वजनिक’ स्वरूपात साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा शिवरायांच्या नावाचा वापर करून चालणाऱ्या या प्रतिमापूजेला जनतेकडून अधिक तीव्र विरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत.
0 Response to "सार्वजनिक शिवजयंतीवर राजकारणाचे सावट; शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी."
एक टिप्पणी भेजें