-->
महाराष्ट्रात आमदाराच्या २३ जागा रिक्त राज्यपाल कोट्यातील ५ जागांवर हालचाली वेगात; विधानपरिषदेत मोठ्या घडामोडी.

महाराष्ट्रात आमदाराच्या २३ जागा रिक्त राज्यपाल कोट्यातील ५ जागांवर हालचाली वेगात; विधानपरिषदेत मोठ्या घडामोडी.


"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी
 
मुंबई :- विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागांबाबत

राजकीय वर्तुळात हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या जागा लवकरच भरल्या जाण्याची शक्यता असून, त्यासाठी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या निवडीत प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे या पाच जागांवर कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घडामोड विधानपरिषद या सभागृहाच्या पुढील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी ठरू शकते.

सध्या विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्यसंख्या असताना त्यापैकी ५५ सदस्य कार्यरत आहेत, तर २३ जागा रिक्त आहेत. याच पार्श्वभूमीवर १४ मे २०२६ रोजी आणखी ९ जागा रिक्त होणार आहेत. या ९ जागा विधानसभेतील आमदारांमार्फत निवडून आलेल्या सदस्यांच्या आहेत. त्यामुळे या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यातून नव्या सदस्यांची निवड होईल. या नऊ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येणार आहे. परिणामी, पुढील काही महिन्यांत विधानपरिषदेचे चित्र लक्षणीयरीत्या बदलण्याची चिन्हे आहेत.

ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे, निलम गो-हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. सध्या विधानसभेत २८६ आमदार असल्याने मतदानाचा कोठा ३६ आमदारांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गणितामुळे पक्षीय समीकरणे आणि संभाव्य आघाड्या यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची रचना विधानसभेपेक्षा वेगळी आहे. हे सभागृह दर पाच वर्षांनी विसर्जित होत नाही. सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. एकूण ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडून येतात. शिक्षकांमधून ७ आणि पदवीधरांमधून ७सदस्य निवडले जातात. तर १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतून करतात. याच राज्यपाल कोट्यातील पाच जागा सध्या रिक्त असून त्या लवकरच भरण्यात येण्याची शक्यता आहे.

0 Response to "महाराष्ट्रात आमदाराच्या २३ जागा रिक्त राज्यपाल कोट्यातील ५ जागांवर हालचाली वेगात; विधानपरिषदेत मोठ्या घडामोडी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article