अतिक्रमणधारकांच्या हक्कासाठी चिचाळ टी-पॉईंटवर भा. क. पक्षाचा एल्गार रास्ता रोको आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष.
बुधवार, 11 फ़रवरी 2026
Comment
राजन मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखांदूर :- अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळावे, सिंचनाचे प्रश्न सुटावे आणि आरोग्य सुविधांचा विस्तार व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बारव्हा -चिचाळ टी-पॉईंट येथे भव्य रास्ता रोको आंदोलन कॉ. भूपेश मेश्राम यांच्या नेतृत्वात नुकतेच करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासकीय धोरणांचा निषेध केला.
या आंदोलनाचे नियोजन प्रामुख्याने अतिक्रमणधारकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आले होते. यामध्ये मुरमाडी, पारडी, चिकना, जैतपूर, कोदामेडी, मळेघाट, सोनी, इंदोरा आणि चपराड या परिसरातील गावांतून शेकडो शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
आंदोलनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना मार्गदर्शक कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. त्यांनी अतिक्रमणधारकांच्या जमिनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
कॉम्रेड भूपेश मेश्राम,यांनी जनतेच्या स्थानिक समस्या सविस्तरपणे मांडल्या आणि प्रशासकीय दिरंगाईचा पाढा वाचला.तर
चेतन राऊत यांनी देखील आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आणि मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला.
आंदोलनाच्या शेवटी लाखांदूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पवार यांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि निवेदन स्वीकारले. यात सर्व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्क (पट्टे) देण्यात यावेत.ज्या शेतकऱ्यांना पट्टे मिळाले आहेत, त्यांच्या सातबारा उताऱ्यावरून 'सरकार' हे नाव कमी करण्यात यावे.
इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात सोडावे आणि दिघोरी परिसराला धरणाचे पाणी पुरवण्यात यावे. दिघोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 'ग्रामीण रुग्णालय' म्हणून दर्जा देण्यात यावा. ग्रामीण भागात तातडीने रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे सुरू करण्यात यावीत.अशा प्रकारच्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
निवेदन सादर करतेवेळी कॉम्रेड शिवकुमार गणवीर, कॉम्रेड भूपेश मेश्राम, कॉम्रेड सुभाष वंजारी, कॉम्रेड सत्यवान मेश्राम यांच्यासह परिसरातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
0 Response to "अतिक्रमणधारकांच्या हक्कासाठी चिचाळ टी-पॉईंटवर भा. क. पक्षाचा एल्गार रास्ता रोको आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष."
एक टिप्पणी भेजें