गोसेखुर्द धरणग्रस्त ढीवर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेचा लढा सुरूच
सोमवार, 9 फ़रवरी 2026
Comment
.
• अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळवून देण्यात हर्षल वाघमारे यांना यश.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पवनी :- गोसेखुर्द धरणामुळे पवनी तालुक्यातील ढीवर समाजाचे झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचा न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल वाघमारे यांनी शासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या होत्या. यापैकी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची मागणी शासनाने मान्य केल्याने ढीवर समाजाला दिलासा मिळाला असून, हा मोबदला मिळवून देण्यात हर्षल वाघमारे यांचा निर्णायक वाटा राहिला आहे.
अतिवृष्टीमुळे पवनी तालुक्यातील ढीवर समाजाचे मासेमारीसाठी लागणारे जाळे, डोंगे व इतर साहित्य वाहून गेले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे एकमेव साधन हिरावले गेले होते. या नुकसानभरपाईसाठी सातत्याने पाठपुरावा करत, आंदोलने करत आणि शासनाचे लक्ष वेधत विदर्भ युवा क्रांती संघटनेने अखेर शासनाकडून आर्थिक मदत मंजूर करून घेतली.
मात्र, ढीवर समाजाचा पारंपारिक व्यवसाय असलेली मासेमारी व नदीपात्रातील डांगरवाड्या गोसेखुर्द धरणामुळे पूर्णपणे बाधित झाल्या आहेत. परिणामी पवनी तालुक्यातील ढीवर समाज रोजगारापासून कायमचा विभक्त झाला आहे. त्यामुळे त्यांना धरणग्रस्त घोषित करून योग्य मोबदला देण्यात यावा, तसेच गोसेखुर्द धरणावर प्रस्तावित जल पर्यटन प्रकल्पामध्ये पवनी तालुका व भंडारा जिल्ह्यातील ढीवर समाजाला आरक्षण देण्यात यावे, या उर्वरित दोन मागण्यांवर शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.
या मागण्यांसाठी हर्षल वाघमारे यांनी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे, जलसमाधी आंदोलनासारख्या टोकाच्या भूमिका घेतल्या. इतकेच नव्हे तर ढीवर समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा येथील कार्यक्रमातही आक्रमक भूमिका घेत “मुख्यमंत्री मुर्दाबाद”चे नारे देत शासनाचा निषेध नोंदवला होता.
गोसेखुर्द धरणावर झालेल्या जलसमाधी आंदोलनाला येत्या 27 फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत असतानाही, पवनी तालुक्यातील ढीवर समाजाला अद्याप संपूर्ण न्याय मिळालेला नाही, ही बाब गंभीर असल्याचे विदर्भ युवा क्रांती संघटनेने स्पष्ट केले आहे.
*हर्षल वाघमारे यांची पुढील भूमिका :*
“आमच्या तीन मागण्यांपैकी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने आर्थिक मदत मंजूर केल्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत. मात्र ढीवर समाजाचा प्रश्न केवळ इतक्यावर संपणारा नाही. जोपर्यंत उर्वरित दोन मागण्या – धरणग्रस्त मोबदला आणि जल पर्यटनामध्ये ढीवर समाजाला आरक्षण – पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत विदर्भ युवा क्रांती संघटनेचा लढा थांबणार नाही. ढीवर समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.”
पवनी तालुक्यातील ढीवर समाजाला मिळालेला हा पहिला दिलासा हर्षल वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाचे फलित असून, उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
0 Response to "गोसेखुर्द धरणग्रस्त ढीवर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेचा लढा सुरूच"
एक टिप्पणी भेजें