समृद्ध शेती, सक्षम शेतकरी, किसान गोष्टी कार्यक्रम.
सोमवार, 16 फ़रवरी 2026
Comment
• नरेंद्रजी भोंडेकर, आमदार भंडारा - पवनी विधानसभा क्षेत्र.
पवनी :- शेतकरी बांधवांनी शेती करिता असतांना नव - नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वापरून शेती करावी जेणेकरून उत्पादन खर्च कमी करून निव्वळ उत्पन्न कसे वाढेल याकरिता लक्ष द्यावे.
शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी आणि त्यासाठी लागणारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वेळ, विविध योजना, लागणारा निधि या सर्व गोष्टीसाठी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असून मी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रत्येक योजना विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहचतील यासाठी विभागातील अधिकारी यांनी प्रयत्न करून शेतकरी स्वयंपूर्ण कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे मोलाचे प्रतिपादन नरेंद्रजी भोंडेकर आमदार,भंडारा - पवनी विधानसभा क्षेत्र यांनी कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, तालुका भंडारा आयोजित किसान गोष्टी कार्यक्रम आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्प्या - ०२ कार्यक्रमामध्ये उपस्थितांना केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या समाविष्ट गावातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेऊन त्याकरिता लागणारा निधी शासन उपलब्ध करून देईल अशी आपणांस ग्वाही देऊन शेतकरी कोणत्याही योजनेपासून वंचित न राहता तळागाळापर्यंत योजनाची माहिती शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी असे मार्गदन नरेंद्रजी भोंडेकर यांनी केले.
सदर किसान गोष्टी कार्यक्रमाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून विलास येवले यांनी उपस्थितांना नैसर्गिक शेती आणि प्रमाणीकरण, पवन कटणकर यांनी शेत बांधावरील प्रयोगशाळा,१० ड्रम थेरी आणि गांडूळ खत प्रकल्प यावर मार्गदर्शन केले.
सुधीर धकाते कृषि तज्ञ यांनी निर्यातक्षम भाजीपाला, जमिनीचे जैविक गुणधर्म, नैसर्गिक निविष्ठा या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. उषा डोंगरावर वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र,साकोली यांनी उपस्थितांना पिक फेरबदल करून उन्हाळी हंगामात, तीळ,उन्हाळी मुंग आणि शिंगाडा लागवड करावे त्यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान कृषि विज्ञान केंद्रातील शस्त्रज्ञ करतील असे मार्गदर्शन केले.
प्रशांत उंबरकर कृषी विज्ञान केंद्र साकोली कीटक शास्त्रज्ञ यांनी उन्हाळी भात लागवड व्यवस्थापन मका लागवड तंत्रज्ञान एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन या विषयावर उपस्थित शेतकरी बंधू सविस्तर मार्गदर्शन केले. वृषाली देशमुख जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृद चाचणी अधिकारी, भंडारा यांनी मातृभिमीला जिवंत ठेवण्याकरिता जमिनीचे जैविक गुणधर्म, उपयोगी जिवाणू आणि माती नमुना,मृद आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन केले.
उर्मिला चिखले प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा यांनी आत्मा अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिश न अभियान, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अभियान या योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, संकल्पना, कृषि ताई यांचे कार्य, योजनेतील घटक यावर सखोल मार्गदर्शन केले.
सदर किसान गोष्टी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव काशिद तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी करून युवा शेतकरी मंच अंतर्गत युथ फार्मर या विषयावर मार्गदर्शन केले.
अरुण हारोडे मंडळ कृषि अधिकारी, भंडारा यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्प्या - ०२ अंतर्गत विविध घटक,योजना,संकल्पना आणि अनुदान, स्वरूप यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन खैरनार नोडल अधिकारी,स्मार्ट, भंडारा,पद्माकर गिदमारे उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा, खिरारी विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र,साकोली, अशोक जिभकाटे मंडळ कृषि अधिकारी, पहेला, गणेश शेंडे उप कृषि अधिकारी, पहेला,अरुण हारोडे मंडळ कृषि अधिकारी, भंडारा,अजय खंडाईत कृषी अधिकारी, भंडारा उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि आभार अजय खंडाईत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत सर्व कर्मचारी, कृषि ताई,नैसर्गिक शेती अंतर्गत कृषि सखी, यांचे मोलाचे सहकार्य लाभून कार्यक्रमाला २०० शेतकरी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
0 Response to "समृद्ध शेती, सक्षम शेतकरी, किसान गोष्टी कार्यक्रम."
एक टिप्पणी भेजें