नवजात बाळ विक्री प्रकरणातील आरोपी डॉक्टराचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
बुधवार, 18 फ़रवरी 2026
Comment
• दुसऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत 21 पर्यंत वाढ.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा/तुमसर :- नवजात बाळाची विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जखमी डॉ. बाजपेयी याच्यावर उपचार सुरू असल्याने अटक लांबणार असली तरी ती अटळ असल्याचे समजते.
दरम्यान याच प्रकरणातील सागर शिक्का याच्या पोलीस कोठडीत २१ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार डॉ. बाजपेयी याच्या अटकपूर्व जामीनावर १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने बाजपेयी याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात गाजत असलेल्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी यांचा
पोलिसांकडून शोध सुरू असतानाच, त्याने स्वतःवर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. सध्या आरोपी असलेला डॉक्टर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नवजात बालिकेवर नागपूर येथे उपचार करण्यासाठी नेत असल्याच्या नावाखाली अडीच लाखात मुलीची विक्री करण्याचे प्रकरण ३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आले. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लालेश्वरी नंदकिशोर सदेपाच रा. रामनगर गोंदिया या महिलेला व सागर शिक्का रा. गोंदिया यांना अटक करण्यात आली आहे. बाळ खरेदी करणारी महिला मालती प्रकाश वाघमारे रा. पांढराबोडी, तसेच पूर्णिमा सतीश
धुर्वे, उमेशसिंग रामचंद्रसिंग गेहलोत दोघेही रा. गोंदिया हे चौघेही फरार आहेत. यातील दोघांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली होती तर मुख्य सूत्रधार असलेल्या डॉ. वाजपेयी याचा शोध सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्याच्या अटकपूर्व जामीनावर भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होते. अटके पासून बचावासाठी घडपडत असलेल्या डॉक्टरांचे एकेक प्रकरण पुढे येत असल्याने त्याचे पाय खोलात जात होते. दरम्यान १४ रोजी कटंगी येथून भंडाराकडे स्वतःच्या वाहनाने येत असताना डॉ. नितेश बाजपेयी याने स्वतःच्या पोटावर आणि शरीरावर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या डॉक्टरला आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सध्या त्याच्यावर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे एसडीपीओ शिवम विसापुर करत आहेत.
0 Response to "नवजात बाळ विक्री प्रकरणातील आरोपी डॉक्टराचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला."
एक टिप्पणी भेजें