पुस्तकाच्या पलीकडे शिक्षण शारदा विद्यालयातील १४५ विद्यार्थी “ संसाराचे मोती “त चमकले.
शुक्रवार, 13 फ़रवरी 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कार, नीतिमूल्ये व भारतीय संस्कृतीची जाण देणारे उपक्रम काळाची गरज बनले आहेत. याच उद्देशाने दैनिक लोकमत तर्फे राबविण्यात येणाऱ्या “संस्काराचे मोती” या अत्यंत लोकप्रिय व मूल्याधिष्ठित सदरात शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथील तब्बल १४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या सहभागाबद्दल दैनिक लोकमत तर्फे सर्व १४५ विद्यार्थ्यांना पेपर पॅड देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवनात नीतिमत्ता रुजविणारे, विचारप्रवृत्तीला चालना देणारे आणि वाचनसंस्कृती जोपासणारे हे सदर विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रिय झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमशील शाळेत “संस्काराचे मोती” हे सदर सातत्याने राबविले जात असून, त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा मिळत आहे. या सदरातूनच शाळेची माजी विद्यार्थिनी कु. श्रेया ईश्वर बोरकर हिला दैनिक लोकमत तर्फे विमानाने दिल्लीला जाण्याची व भारताचे माजी उपराष्ट्रपती मा. व्यंकय्या नायडू यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची दुर्मिळ व प्रेरणादायी संधी मिळाली होती, ही बाब शाळेसाठी अभिमानास्पद आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना प्राचार्य राहुल डोंगरे म्हणाले,
“संस्काराचे मोती हे केवळ एक सदर नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीचा संस्कारमंच आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढते, वाचनसंस्कृती रुजते आणि नीतिमूल्यांची जोपासना होते. भावी पिढी सुसंस्कृत, विचारवंत आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत.”
याप्रसंगी शिक्षकवृंद ज्योती बावनकर, दिपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, अशोक खंगार, अंकलेश तिजारे, विद्या मस्के, नितुवर्षा मुकुरने, प्रिती भोयर, बेनिता रंगारी, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, नेहा बारई, नारायण मोहनकर, दिपक बालपांडे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
संस्कार, संस्कृती आणि ज्ञानाची सांगड घालणारा “संस्काराचे मोती” हा उपक्रम शारदा विद्यालयाची शैक्षणिक ओळख अधिक उजळविणारा ठरत असून, विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासात तो दिशादर्शक ठरत आहे.
0 Response to "पुस्तकाच्या पलीकडे शिक्षण शारदा विद्यालयातील १४५ विद्यार्थी “ संसाराचे मोती “त चमकले."
एक टिप्पणी भेजें