-->
आदर्श हायस्कूलच्या ​विद्यार्थी व शिक्षकांच्या घामातून बहरली 'पळसबाग'

आदर्श हायस्कूलच्या ​विद्यार्थी व शिक्षकांच्या घामातून बहरली 'पळसबाग'


• सेंद्रिय भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारात समावेश
​
राजन मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
लाखांदूर :- पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व कळावे आणि शेतीचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील आदर्श हायस्कूलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या परिसरात एक नंदनवन फुलवले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पिकवलेला हा ताजा भाजीपाला आता विद्यार्थ्यांच्या रोजच्या माध्यान्ह भोजनाची चव वाढवत आहे.
​आदर्श हायस्कूलला सुसज्ज इमारत आणि खेळाचे मोठे मैदान लाभले आहे. या मैदानाच्या बाजूला असलेली रिकामी जागा वाया जाऊ न देता, तिचा विधायक वापर करण्याचे शाळेने ठरवले. 'पळसबाग' या संकल्पनेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येत या जमिनीची मशागत केली आणि विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली.
​या बागेत सध्या विविध प्रकारची पिके डोलत आहेत. यामध्ये प्रामुख्याने वांगी, टमाटर, मिरची, कारली, वाल., फुलकोबी, पत्ताकोबी, कांदे.भाज्यांचा समावेश आहे.
​आजच्या काळात रासायनिक फवारणीमुळे अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, आदर्श हायस्कूलच्या या बागेत कोणत्याही प्रकारची औषध फवारणी करण्यात आलेली नाही. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकवण्यात आला आहे. शाळा संचालक सुनील भोवते आणि शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमात स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना लागवडीपासून ते लालन-पालनापर्यंतचे सर्व धडे दिले आहेत.
​बागेत आता भाजीपाला चांगलाच बहरला असून फळे लागली आहेत. दररोज शाळेच्या वतीने दिला जाणाऱ्या शालेय पोषण आहारात याच ताज्या आणि विषमुक्त भाजीपाल्याचा वापर केला जात आहे. स्वतःच्या हाताने लावलेल्या भाज्या जेवणात मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

​"विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी कीडा न बनवता त्यांना शेतीची आवड निर्माण व्हावी आणि निसर्गाशी नाते जोडले जावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातून त्यांना श्रमाची किंमत कळत आहे."

सुनील भोवते, शाळा संचालक
​

0 Response to "आदर्श हायस्कूलच्या ​विद्यार्थी व शिक्षकांच्या घामातून बहरली 'पळसबाग'"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article