आसाममध्ये सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर यांच्यासह दोन वैमानिक शहीद.
शनिवार, 7 मार्च 2026
Comment
आसाम | ६ मार्च २०२६ ला फायर जेट कोसळले.
नरेंद्र मेश्राम
"साप्ता.जनता की आवाज"
भंडारा :- भारतीय हवाई दलाचे 'सुखोई एसयू-३० एमकेआय' हे लढाऊ विमान आसाममध्ये अपघाताचा बळी ठरले असून,यामध्ये महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर यांच्यासह दोन वैमानिकांना वीरमरण आले आहे. हवाई दलाने आज सकाळी या दुर्दैवी घटनेची अधिकृत पुष्टी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे लढाऊ विमान आपल्या नियमित सराव मोहिमेवर असताना अचानक त्याचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क तुटला. रडारवरून विमान गायब होताच हवाई दलाने तातडीने शोध मोहीम राबवली. आज (६ मार्च) पहाटे एकच्या सुमारास अपघाताची प्राथमिक माहिती समोर आली आणि त्यानंतर सकाळी ९:१५ वाजता हवाई दलाने दुसऱ्या 'एक्स' पोस्टद्वारे दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी दिली.
लष्कराकडून अपघातग्रस्त भागामध्ये अद्यापही शोध मोहीम सुरू आहे.हवाई दलाने या घटनेच्या चौकशीसाठी एक विशेष टीम आसामला पाठवली आहे. विमानाचा संपर्क नेमका का तुटला आणि अपघाताचे नेमके तांत्रिक कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे.
सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय हवाई दलातील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमान मानले जाते. दोन इंजिन असलेले हे विमान हवाई संरक्षण आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या १२ वर्षांत सुखोई फायटर जेट कोसळण्याची ही आठवी वेळ असल्याने लढाऊ विमानांच्या तांत्रिक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, वीरपुत्र पूर्वेश दुरगकर यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
0 Response to "आसाममध्ये सुखोई-३० लढाऊ विमान कोसळले; भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर यांच्यासह दोन वैमानिक शहीद."
एक टिप्पणी भेजें