बिलंदरपणाने जगणारे कलंदर कवि-सुरेश भट..
शनिवार, 14 मार्च 2026
Comment
. लेखक प्रभाकर सोमकुवर
प्रभाकर सोमकुवर
नागपुर
भ्रमणध्वनी : 9595255952
माणूस सहवासातूनच “माणूस” बनतो. कधी-कधी तर छोटीशी भेट देखील जीवनाचं आयामच बदलून टाकते. माणूस मरतो परंतू त्यांचे विचार मरत नसतात, ते त्यांच्या कार्यशैलीमुळे जीवित असतात. हे अधोरेखित सत्य आहे. वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्यांची ती कविता आणि त्यांचे ते गाणे हे तिन्ही घटक त्या कवितेच्या संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असे वाटायला लागते.हे एक विलक्षण अद्वैत मिश्रण आहे. त्यांची कविता ऐकताना किंवा वाचताना सुरेश भट नावाचा एक मस्त कलंदर माणूस निराळा काढता येत नाही.
माझ्या सुदैवाने सुरेश भटांसारख्या सिध्दहस्त प्रतिभावंत कविचा स्नेह मला लाभला.त्यांचा तो बेडरपणा, दिलदारपणा, हळवेपणा, लोभसवाणा होता, कारण कविते-इतकेच त्यांचे कविता ऐकणाऱ्यावर, जीवनातल्या व्यवहारी धडपडीपलीकडे काही पाहू इच्छिणाऱ्यांवर, ते जाणून घेण्याची तळमळ असणाऱ्यांवर, माणसांच्या चांगुलपणावर प्रेम होते. “साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी” असे ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत. त्या साध्यासुध्या माणसांशी साधायच्या संवादाचे त्यांना मोल मोठे वाटायचे. ओळखण्याची त्यांची हातोटी वेगळीच होती. सान असो वा मोठा सगळे सारखेच, त्यांच्या प्रेमात फारकत नव्हती. तेव्हा त्यांनी साप्ताहिक बहूमत नावाचे वर्तमानपत्र सुरु केले, त्यात माझा, जैमिनी कडु यांचा सहकारी म्हणून समावेश होता.
कविला माणसेच कवी म्हणून जगवतात व शिल्लक ठेवतात. कवी हा लिहिणारा “माणूस” असतो आणि बहुधा जीवन असे असते की ते कविला मनाप्रमाणे लिहू ही देत नाही अन् जगू ही देत नाही. या जगात असच चालतं. कवितेच्या प्रांतात गझल सम्राट म्हणून कवी सुरेश भटांना असली आपुलकी लाभली, म्हणूनच तर नेहमी माणसांचा गोतावळा त्यांच्या अवतीभवती असायचा, त्यात मी सुध्दा सामील होतो. “सजीव जो वरी लता देती, मरणा घेती खांद्यावरती” जीवन असतांना किंमत नसते, मरणानंतर त्याची महती कळते. अशा या थोर कवीचं नागपूर नगरीच्या महानगरपालिकेने त्यांचं स्मारक म्हणून कविवर्य सुरेश भट सभागृह बांधुन औचित्य साधलं. परंतू शासनाकडून एखादा सत्कार किंवा ‘डॉक्टरेट’ वगैरे काहीही मिळाले नाही, त्याबद्दल अत्यंत वाईट वाटते. खरच ही शोकांतिका आहे.
कवि सुरेश भटांची अनेक गीते चित्रपटासाठी आणि चित्रपटांशिवाय ध्वनिमुद्रित झालेली आहेत, त्यांच्या शब्दांना सुरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, देवकी पंडित, सुरेश वाडकर, अरुण दाते आणि नामवंत गायक-गायिकांचा सुरेख कंठ लाभलेला असून ह्दयनाथ मंगेशकर, सी. रामचंद्र व बऱ्याच संगीतकारांचे त्यांच्या गीतांना संगीत लाभलेले आहे. त्यामुळे त्यांच्या अनेक अविस्मरणीय रचना आजही अजरामर झालेल्या आहेत. ते हयात नसले तरी त्यांनी वेळोवेळी केलेले प्रामाणिक प्रयत्न कधीही विसरता येणे शक्य नाही. कविवर्य सुरेश भटांचे ऋण कधीच फिटणार नाहीत. तेव्हा त्यांच्या ऋणांच्या ओझ्यात राहायला मला आवडेल!...
कविवर्य सुरेश भटांच्या २३ व्या
पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!..
0 Response to "बिलंदरपणाने जगणारे कलंदर कवि-सुरेश भट.."
एक टिप्पणी भेजें