लिंगभाव विषमता हे सर्व प्रश्नांचे मूळ : अँड सुरकार.
रविवार, 29 मार्च 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- 'लिंगभाव विषमतेमुळेच समाजात वर्चस्वाची भावना निर्माण झाली. या विषमतेमुळेच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय पेच निर्माण झाले. त्यामुळे लिंगभाव विषमता हे सर्व प्रश्नांचे मूळ आहे', असे प्रतिपादन विदर्भातील पहिल्या पारलिंगी वकील एड. शिवानी सुरकार यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयामध्ये शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. 'लिंगभाव समानता : आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन' या विषयावर ही एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद महाविद्यालयातील कला शाखा व IQAC च्या वतीने आयोजित करण्यात आली.
या परिषदेच्या उद्घाटक म्हणून विदर्भातील पहिल्या पारलिंगी वकील ऍड. शिवानी सुरकार (वर्धा) तर ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या छायाताई खोब्रागडे (नागपूर) या बीजभाषक म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून लिंगभाव अभ्यासक डॉ धम्मसंगिनी रमागोरख (बार्शी, सोलापूर) या उपस्थित होत्या. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत हे उपस्थित होते.
याप्रसंगी परिषदेच्या बीजभाषक छायाताई खोब्रागडे यांनी स्त्री प्रश्नाचे सखोल विश्लेषण करून व्यापक स्त्रीवादाची मांडणी केली. यावेळी डॉ धम्मसंगिनी रमागोरख यांनी प्रबोधनात्मक कृती कार्यक्रमातून लिंगभाव समानता निर्माण होऊ शकते, अशी सकारात्मक मांडणी केली.
'लिंगभाव समानता : संकल्पना, स्वरूप व व्याप्ती' या विषयावरील पहिल्या सत्रामध्ये डॉ धनंजय सोनटक्के (प्रियदर्शनी महिला महाविद्यालय, वर्धा) हे प्रमुख वक्ते म्हणून तर अध्यक्ष म्हणून डॉ प्रदीप मेश्राम (कार्यकारी प्राचार्य, जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा) हे उपस्थित होते. 'लिंगभाव विषमता : वर्तमान, वास्तव, प्रश्न व उपाययोजना' या विषयावरील दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या यामिनी चौधरी या प्रमुख वक्त्या म्हणून तर या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ महेंद्र उके (प्राचार्य, शासकीय अग्रसेन महाविद्यालय बिल्हा, बिलासपूर, छत्तीसगढ) हे उपस्थित होते.
'लिंगभाव समानता : कृतिशील भूमिका व जबाबदारीची निकड' या विषयावरील तिसऱ्या सत्रामध्ये डॉ दीपक पवार (महिला महाविद्यालय, नागपूर) हे प्रमुख वक्ते म्हणून तर डॉ सुरेंद्र पवार (प्राचार्य, एन. जे. पटेल महाविद्यालय, मोहाडी) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत हे उपस्थित होते.
लिंगभावासंबंधी विविध संकल्पना, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक व राजकीय वास्तव, विषमतेचे प्रश्न व लिंग आधारित भेदभाव निर्मूलन अशा मूलभूत विषयांवर या परिषदेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्तरावरील ३२० पेक्षा अधिक प्राध्यापक, संशोधक व अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. तसेच विविध विषयांतील प्राध्यापक, अभ्यासक व जिज्ञासूंनी या परिषदेत संशोधनपर निबंधवाचन केले. या परिषदेच्या निमित्ताने एकूण २१७ संशोधनपर लेखांना B-Adhar संशोधन नियतकालिकाच्या तीन खंडांमधून प्रकाशित करण्यात आले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिषदेचे समन्वयक डॉ भारती काटेखाये व डॉ गोल्डी बघमार यांनी परिश्रम घेतले.
या परिषदेचे प्रस्ताविक परिषदेचे समन्वयक डॉ भारती काटेखाये यांनी केले. डॉ रेणुकादास उबाळे, प्रा अमोल खांदवे, डॉ अरुणा बावनकर, डॉ व्यंकटेश मोरे यांनी केले. तर डॉ रजनी गायधने व डॉ राजेंद्र बेलोकार यांनी आभार मानले. याप्रसंगी भारतातील अनेक नामवंत संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "लिंगभाव विषमता हे सर्व प्रश्नांचे मूळ : अँड सुरकार."
एक टिप्पणी भेजें