मानवी पॅपिलोमा विषाणू लसीकरणाविरोधात ग्रामसभेचा ठराव.
मंगलवार, 10 मार्च 2026
Comment
• दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत ठरली देशातील पहिली; जबरदस्तीविरोधात ग्रामस्थांची भूमिका.
दिगंबर देशभ्रतार
साप्ता."जनता की आवाज"
भंडारा :- शासनाने ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना मानवी पॅपिलोमा विषाणूविरोधी लस देण्याचा निर्णय घेतला असताना भंडारा जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील दिघोरी ग्रामपंचायतीने या लसीकरणातील संभाव्य जबरदस्तीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर केला आहे. असा ठराव करणारी दिघोरी ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शासनाच्या मोहिमेनुसार या वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने लसीकरण राबविले जात आहे. मात्र काही पालकांनी या लसीबाबत शंका व्यक्त करत संभाव्य दुष्परिणामांविषयी चिंता व्यक्त केली आहे. लसीकरण अनिवार्य नसतानाही काही ठिकाणी अधिकारी, कर्मचारी किंवा शाळांमार्फत पालक व विद्यार्थिनींवर अप्रत्यक्ष दबाव येण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर गावातील युवक अभय डी. रंगारी यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. आरोग्यविषयक बाबींमध्ये प्रत्येक व्यक्तीस स्वतःच्या शरीरावर निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय राज्यघटनेनुसार जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे व्यक्तीच्या संमतीशिवाय औषध किंवा लस देणे हा त्या अधिकाराचा भंग ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामसभेत यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर गावकऱ्यांनी एकमताने ठराव मंजूर केला. या ठरावानुसार गावात कोणत्याही मुलीवर किंवा पालकांवर लसीकरणासाठी जबरदस्ती करण्यात येऊ नये, अशी भूमिका ग्रामसभेने घेतली आहे. लसीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पालक व विद्यार्थिनींचाच असल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले.
दरम्यान, अभय रंगारी यांनी यापूर्वी स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरोधातही ग्रामसभा ठराव मोहीम राबविली होती. "ना राज्यसभा, ना लोकसभा... सर्वात मोठी ग्रामसभा," असा संदेश देत ग्रामसभेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले होते.
ग्रामसभेने घेतलेल्या या ठरावामुळे गावात आरोग्यविषयक निर्णयांबाबत जागरूकता वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात गावात कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने औषध किंवा लस देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात संबंधितांकडे तक्रार करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
0 Response to "मानवी पॅपिलोमा विषाणू लसीकरणाविरोधात ग्रामसभेचा ठराव."
एक टिप्पणी भेजें