तुमसर नगर परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा.
बुधवार, 29 अप्रैल 2026
Comment
नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून तीव्र निषेध
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- ता २७ शहरात गेल्या काही दिवसांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावरून सोमवारी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. शहरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविका रोशनी भोंडेकर यांच्या नेतृत्वात महिलांनी नगर परिषदेवर घागर मोर्चा काढला. मात्र, आंदोलनाच्या वेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी दोघेही अनुपस्थित असल्याने संतप्त महिलांनी नगर परिषदेच्या आवारात मडके फोडून नगराध्यक्ष सागर गभने यांच्या रिकाम्या खुर्चीवर मडके आणि हार चढवून त्यांचा निषेध केला.
तुमसर शहरातील अनेक प्रभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, सोमवारी परिसरातील महिलांनी रिकाम्या घागरींसह नगर परिषद गाठली. 'पाणी द्या, अन्यथा खुर्चा सोडा' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
तुमसर नगर परिषदेवर काढलेल्या घागर मोर्चात सहभागी महिला व पुरुष.
रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध!..
आंदोलकर्त्या महिला कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात पोहोचल्या. तेव्हा नगराध्यक्ष सागर गभने आणि मुख्याधिकारी आपल्या कक्षात उपस्थित नव्हते. जबाबदार लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांचा रोष अधिकच वाढला. यावेळी त्यांनी नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीवर मडके ठेवले. त्यांच्या खुर्चीला हार घालून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेविका साहिन तुरक, रेखा चकोले, शीतल पेठे, सोनिया धुर्वे, गीता कोंडेवार, वैशाली भवसागर, पाणीपुरवठा सभापती सुनील डोंगरे, पंकज बालपांडे, गौरीशंकर कारेमोरे, जाकिर तुरक, विक्रम लांजेवार उपस्थित होते.
शहरात पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना नगराध्यक्ष आणि अधिकारी गायब आहेत. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आज आम्ही खुर्चीवर मडके ठेवून निषेध केला आहे. पुढे यापेक्षा तीव्र पाऊल उचलले जाईल.
0 Response to "तुमसर नगर परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा."
एक टिप्पणी भेजें