चक्रीवादळी पावसानंतर पुन्हा गारांसह अवकाळीचा तडाखा!
बुधवार, 13 मई 2026
Comment
धान, मका व भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान.
नरेंद्र मेश्रम
साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- गत शनिवारच्या चक्रीवादळी पावसानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा पालांदूर व परिसरात विजांच्या कडकडाटासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे धान, मका व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
तीन दिवसांच्या प्रचंड उकाड्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह गारांचा वर्षाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. अनेक शेतकऱ्यांनी वाळवण्यासाठी अंगणात व शेतात टाकून ठेवलेला मका पावसात भिजला. तर काही ठिकाणी धान ओले होऊन नुकसान झाले.
गत शनिवारच्या वादळी पावसात आधीच अनेकांचे धानपीक भुईसपाट झाले होते. त्यातून सावरत असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे. गारांच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याच्या मळ्यांचेही नुकसान झाले. शेतकरी मोहन लांजेवार यांच्या पालक भाजीच्या मळ्याचे मोठे नुकसान झाले असून ज्ञानेश्वर भेदे यांच्या शेतातील पिकांनाही फटका बसला आहे. तसेच रमेश हटवार यांच्या मका पिकाचे नुकसान झाले असून मिरची उत्पादक अरुण पडोळे यांनाही मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती आहे.
हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तापमान ४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून पूर्व मान्सूनच्या स्वरूपात अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
फोटो : ज्ञानेश्वर भेदे यांच्या शेतात पडलेल्या गारा.
0 Response to "चक्रीवादळी पावसानंतर पुन्हा गारांसह अवकाळीचा तडाखा!"
एक टिप्पणी भेजें