पारा ४५.२ अंशावर; उष्माघाताने दोघांचा बळी.
शुक्रवार, 22 मई 2026
Comment
• चार दिवसांपासून तापमानात वाढ
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यात तापमान उच्चांक गाठत आहे. गोंदिया जिल्ह्याचे आजचे तापमान ४५.२ अंशाच्या वर नोंदविण्यात आले. परिणामी अंगाची लाहीलाही होत असून नागरिक अक्षरशः घामाने भिजून निघत आहेत. तर दुसरीकडे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील शेतकरी विनोद विश्वनाथ राऊत (३८) तर तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील झुलनबाई बुधा भालाधरे (७०) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे तापमान पहिल्यांदाच ४५. २ अंशावर पोहचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
हवामान विभागाने पुढील तीन चार दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर होता. तर बुधवारी ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदा २६ एप्रिल रोजी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
प्रशासनाचा खबरदारीचा इशारा
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्या मते, या तीव्र उष्णतेमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने डिहायड्रेशन, चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी आणि उष्माघाताचे प्रकार वाढू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी पिणे, ओआरएसचे सेवन करणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे आणि शक्यतो दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाचा परिणाम वीज वापरावरही दिसून येत आहे. कुलर, एसी आणि पंख्यांचा वापर वाढल्याने वीज मागणीत मोठी वाढ झाली आहे. काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
त्यातच २० मे रोजी ४४.९ तर आज २१ मे रोजी दुपारीच्या वेळी ४५.२ वर तापमानाचा पारा पोहचला होता. या मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद या वर्षी करण्यात आली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने वाढत्या उकाड्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले. कुलर,
पंखेसुद्धा काम करीत नसल्याने कधी एकदा पावसाळा सुरू होतो आणि उकाड्यातून सुटका मिळते असेच जिल्हावासीय म्हणतआहे. वाढत्या तापमानामुळे दैनंदिन वेळापत्रकावरसुद्धा परिणाम झाला आहे. दुपारच्या वेळेस शहरातील रस्तेओस पडलेले दिसत आहे. तर शेतकरी बांधवसुद्धा सकाळी ६ ते
१० या कालावधीत शेतीची कामे करीत आहे. तर दुसरीकडे दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विनोद राऊत हे रोजंदारीवर शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सध्या रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व बांधणीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने ते आज सकाळी शेतकऱ्याकडे कामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांनी घरी जातो म्हणून निघून आले मात्र गावात येताच रस्त्याच्या कळेला कोसळून त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक वैद्यकीय माहितीनुसार, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी व्यक्त केली असून पुढील वैद्यकीय व प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या घटनेत तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील झुलनबाई भालाधरे यांचाही २० मे रोजी सायंकाळी उष्माघाताने मृत्य झाला. माजी उपसरपंच स्वप्नील महाजन यांनी दिल्या माहितीनुसार झुलनबाईला सायंकाळच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने घरीच त्यांचा मृत्यू झाला.
0 Response to "पारा ४५.२ अंशावर; उष्माघाताने दोघांचा बळी."
एक टिप्पणी भेजें