देव्हाडी ग्रामपंचायतीत चौकशी होईपर्यंत भरतीला स्थगिती.
शनिवार, 16 मई 2026
Comment
• खंडविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ; लिपिकाच्या जन्मतारखेतील घोळही चर्चेत.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
तुमसर :- देव्हाडी ग्रामपंचायतीमध्ये वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी न घेता विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश देत भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
देव्हाडी ग्रामपंचायतीकडून ५ मे २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून लिपिक, पाणी पुरवठा कर्मचारी व कचरा गाडी चालक अशा प्रत्येकी एका पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांकडून १२ मेपर्यंत अर्ज
मागविण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रत्येक पदासाठी १०० रुपये अर्ज शुल्कही निश्चित करण्यात आले होते.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामपंचायतीतील शिपाई ममता गयगये यांनी केला. त्यांनी यासंदर्भात पंचायत समितीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून भरती तत्काळ स्थगित करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेत पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी देव्हाडी यांनी ग्रामपंचायतीला पत्र पाठवून संबंधित प्रकरणाची १८ मे रोजी चौकशी
करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत लिपिक पदासह सुरू असलेली भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, देव्हाडी विद्यमान ग्रामपंचायतीतील लिपिकाच्या जन्मतारखेबाबतही घोळ असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याने संबंधित पद रिक्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता होणाऱ्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेबाबत कोणावर कारवाई होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
0 Response to "देव्हाडी ग्रामपंचायतीत चौकशी होईपर्यंत भरतीला स्थगिती."
एक टिप्पणी भेजें