दारू, सट्टा अन् आता ‘ऑनलाईन लॉटरी’चा विळखा..
सोमवार, 25 मई 2026
Comment
• तरुणाई बरबादीच्या उंबरठ्यावर, शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त!.
रोशन खोब्रागडे
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये आधी दारूचे व्यसन, त्यानंतर सट्ट्याची चटक आणि आता बेकायदेशीर ‘ऑनलाईन लॉटरी’च्या माध्यमातून तरुण पिढीला जुगाराच्या विळख्यात ओढले जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. “क्षणात श्रीमंत होण्याचे” आमिष दाखवत सुरू असलेला हा काळाबाजार आता अनेक कुटुंबांच्या उद्ध्वस्त होण्याचे कारण ठरत असून, मजूर, सामान्य नागरिक आणि विशेषतः महाविद्यालयीन युवक या मोहाच्या जाळ्यात वेगाने अडकताना दिसत आहेत.
पूर्वी सट्टा किंवा मटका खेळण्यासाठी ठराविक ठिकाणी जावे लागायचे. दारूसाठी गुत्त्यावर जावे लागायचे. त्यामुळे समाजात काही प्रमाणात भीती आणि सामाजिक दबाव होता. मात्र, तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे आता जुगार थेट मोबाईलच्या स्क्रीनवर पोहोचला आहे. विविध बेकायदेशीर ‘ऑनलाईन लॉटरी’ आणि डिजिटल सट्ट्यांच्या माध्यमातून अवघ्या १०-२० रुपयांपासून सुरू होणारा हा खेळ पुढे हजारो-लाखोंच्या कर्जात नेऊन सोडत आहे. सुरुवातीला काही रक्कम जिंकवून व्यसनाची चटक लावली जाते आणि नंतर सतत “मोठा फायदा” मिळण्याच्या आशेवर नागरिकांची आर्थिक लूट सुरू राहते. अनेक तरुण दिवस-रात्र मोबाईलवर या जुगारात गुंतलेले दिसत असून, त्यातून मानसिक ताण, नैराश्य आणि कौटुंबिक कलह वाढताना दिसत आहे.
दारूमुळे अनेक घरांमध्ये आर्थिक चणचण, कौटुंबिक हिंसा आणि मानसिक तणाव वाढत आहे. अनेक कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे.
गल्लीबोळांमध्ये एजंट्सच्या माध्यमातून चालणारा सट्टा आजही सुरू असून, गरीब आणि कष्टकरी वर्गाचे घामाचे पैसे यात वाहून जात आहेत." एका क्लीकवर नशीब चमकवा "अशा जाहिरातींनी तरुणांना आकर्षित केले जात आहे. काही वेळा जिंकलेली रक्कम दाखवून विश्वास निर्माण केला जातो आणि त्यानंतर नागरिकांचा खिसा रिकामा करण्याचा खेळ सुरू होतो. या व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या अनेक तरुणांवर लाखो रुपयांचे कर्ज झाल्याच्या चर्चा परिसरात सुरू आहेत. हे कर्ज फेडण्यासाठी काही जण घरातील दागिने विकणे, मित्र-नातेवाईकांकडून खोटे सांगून पैसे उकळणे, तर काहीजण चोरी किंवा सायबर गुन्हेगारीच्या मार्गावर गेल्याचेही बोलले जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या आर्थिक आणि मानसिक तणावातून काही तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना प्रभागात खुलेआम ऑनलाईन लॉटरीचे व्यवहार सुरू असल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. “हे सर्व इतक्या उघडपणे सुरू असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर या प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला आहे.
प्रभागातील नागरिक, महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाया न करता, अवैध दारू, सट्टा आणि ऑनलाईन लॉटरीचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेतून वाचवण्यासाठी जनजागृती मोहिमांसोबत कठोर कायदेशीर कारवाईचीही आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
“आजच या अवैध धंद्यांना आळा घातला नाही, तर उद्याची संपूर्ण पिढी कर्जबाजारी, व्यसनी आणि उद्ध्वस्त होईल,” अशी तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
0 Response to "दारू, सट्टा अन् आता ‘ऑनलाईन लॉटरी’चा विळखा.."
एक टिप्पणी भेजें