-->
मानेगावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई....

मानेगावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई....


• ग्रामपंचायतीच्या RO प्लांटचे पाणी मोफत देण्याची मागणी.

• युवा संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे ग्रामपंचायतीला निवेदन.

    रोशन खोब्रागडे (ता.प्र.)
"साप्ताहिक जनता की आवाज"

लाखनी :- तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असून, आता पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयातील RO प्लांटमधून गावकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मोफत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था, मानेगाव/सडक यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन सादर केले. सध्या गावात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने अनेक मार्ग बंद झाले असून नागरिकांना दैनंदिन कामांसाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाच्या दुसऱ्या बाजूस जाणे नागरिकांसाठी अत्यंत कठीण ठरत आहे.
महिला, वृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत असून, अनेक कुटुंबांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेल्या RO प्लांटचे पाणी नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासोबतच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने आवश्यक उपाययोजना व पर्यायी व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गावकऱ्यांमध्ये वाढत्या पाणीटंचाईमुळे नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Response to "मानेगावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई...."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article