बारव्हा येथे आधारभूत मका खरेदी केंद्र सुरु..!
शुक्रवार, 8 मई 2026
Comment
• माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या प्रयत्नांना यश.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील बारव्हा येथे अखेर आज,दि.८ मे रोजी शासकीय गोदामात आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत शासनाने हे केंद्र सुरू केल्याने परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
आज सकाळी 10वाजता बारव्हा येथील शासकीय गोदामात तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव बुद्धे यांच्या हस्ते मका पिकाचे व काट्याचे पूजन करून मोजणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाखांदूर तालुक्यात यंदा रब्बी हंगामात मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. पीक कापणीला येऊन १५-२० दिवस उलटले तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. यासाठी तहसीलदार आणि संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी ८ मे रोजी बारव्हा फाटा येथे 'रास्ता रोको' आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची प्रशासनाने तातडीने दखल घेत आंदोलनाच्या दिवशीच केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मका पीक मागील १५-२० दिवसांपासून निघण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शासकीय केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्याने अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला माल १७०० ते १८०० रुपये या कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, उशिरा का होईना केंद्र सुरू झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांना आता आधारभूत किमतीचा लाभ मिळणार आहे.
या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश ब्राह्मणकर, शिवसेना (उबाठा) तालुका अध्यक्ष विनोद ढोरे, ठाणेदार प्रमोद शिंदे, विजयलक्ष्मी सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष स्वप्निल हटवार, उपाध्यक्ष लोचन पारधी, सचिन राऊत, रुपेश वझाडे, दादा अलोने, केसव दिवठे, चंद्रकांत बुरडे यांसह परिसरातील बहुसंख्ये शेतकरी उपस्थित होते.
0 Response to "बारव्हा येथे आधारभूत मका खरेदी केंद्र सुरु..!"
एक टिप्पणी भेजें