OBC समाजाच्या अस्तित्वाकरिता जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलम द्या - गोरेगावात माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली व आंदोलन यशस्वी.
शुक्रवार, 29 मई 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
गोंदिया :- जिल्ह्यातील गोरेगाव येथे अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी OBC समाजासाठी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी भव्य बाईक रॅली काढून राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या नावे तहसीलदार, गोरेगाव मार्फत निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलनाचे नेतृत्व भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने OBC बांधव, युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. OBC समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी एकत्र आलेल्या समाजबांधवांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण आंदोलनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
सकाळी ठाणा चौक येथून भव्य बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. हातामध्ये झेंडे, बॅनर आणि घोषणा फलक घेऊन सहभागी झालेल्या युवकांनी संपूर्ण गोरेगाव शहरात OBC जनगणनेचा आवाज बुलंद केला. “OBC जनगणना झालीच पाहिजे”, “OBC ना स्वतंत्र कॉलम मिळालाच पाहिजे”, “OBC समाजाला न्याय द्या”, “आमचा हक्क आम्हाला द्या” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
रॅली ठाणा चौक मार्गे तहसील कार्यालय, गोरेगाव येथे पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या वतीने तहसीलदार मार्फत शासनाच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये भारताच्या आगामी जनगणनेत OBC समाजासाठी स्वतंत्र व स्पष्ट कॉलम देण्यात यावा, OBC समाजाची अचूक जातनिहाय नोंद व्हावी आणि समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात OBC समाज देशातील मोठा घटक असूनही आजपर्यंत अनेक योजनांमध्ये व धोरणांमध्ये दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त केली. समाजाच्या अस्तित्व, हक्क, आरक्षण, शैक्षणिक प्रगती, राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायासाठी स्वतंत्र OBC जनगणना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
डॉ. खुशाल बोपचे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की, OBC समाजाने आता आपल्या अधिकारांसाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे. शासनाने OBC समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनगणना प्रक्रियेत स्वतंत्र OBC कॉलमचा समावेश तात्काळ करावा, अन्यथा भविष्यात देशभरात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनामध्ये विविध गावांमधून आलेल्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. महिला बांधवांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमाचे नियोजन, शिस्तबद्ध रॅली, शांततापूर्ण वातावरण आणि मोठ्या प्रमाणातील जनसहभाग यामुळे संपूर्ण आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये युवा नेते रविकांत (गुड्डू) बोपचे, गणेश भाऊ पारधी, जगदीश भाऊ ऐरोला (गोरेगाव), मलेश्यामजी योरोला, ओमप्रकाशजी कटरे, रवींद्र (पप्पू) बिसेन (गोरेगाव), प्रदेश उपाध्यक्ष अर्चना ताई चौधरी, प्रमिला रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्ष मुकेश नागपुरे, प्रदेश उपाध्यक्ष दिगंबर बोपचे, तालुका अध्यक्ष योगेश्वर चौधरी (गोरेगाव) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष व्ही. टी. पटले, जिल्हा कमिटीचे जिल्हा महासचिव डॉ. प्रकाश पटले तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये व्ही. टी. पटले (अध्यक्ष), बी. एल. कावळे (उपाध्यक्ष), डी. टी. गौतम (उपाध्यक्ष), श्री. तिलकचंद सी. बोपचे (उपाध्यक्ष), नागेशकुमार एम. बघेले (उपाध्यक्ष), डॉ. प्रकाशकुमार जी. पटले (महासचिव), प्रमोद प्रेमानंद लांजेवार (सचिव), राधेश्याम जी. पटले (सहसचिव), पंकज श्रीराम चव्हाण (प्रसिद्धी प्रमुख), सौ. सारिका संजय येळे (महिला संघटन मंत्री), संजय लखनलाल पटले (संघटन सचिव), विनोद पुंडे, धनराज बी. कटरे व सुरेशकुमार एम. बिरनवार यांची उपस्थिती लाभली.
या भव्य आंदोलनामुळे OBC समाजाची एकजूट, संघटनशक्ती आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याची तयारी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यासमोर अधोरेखित झाली आहे.
0 Response to "OBC समाजाच्या अस्तित्वाकरिता जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलम द्या - गोरेगावात माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली व आंदोलन यशस्वी."
एक टिप्पणी भेजें