परसवाडा ( दे.) येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट.
बुधवार, 3 जून 2026
Comment
• सुदैवाने जीवितहानी टळली; राखडे कुटुंबाचा संसार उघड्यावर
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- तालुक्यातील परसवाडा (दे.) येथे २ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास रोशन बाला राखडे यांच्या घरी इंडियन गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, कपडे, मोबाईल आणि खाद्यपदार्थ जळून खाक झाले असून, राखडे कुटुंब उघड्यावर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेच्या दिवशी सकाळी ७ च्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. आगीने काही मिनिटांतच रौद्र
रूप धारण केल्याने राखडे कुटुंबाच्या घरातील सर्व वस्तू जळून राख झाल्या. याआगीत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, डोक्यावरचे छप्पर गेल्याने कुटुंब पुरते हतबल झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपसरपंच पवन खवास यांनी तातडीने सक्रिय होत संबंधित महसूल विभाग, तलाठी आणि जिल्हा परिषद सदस्यांना पाचारण केले. जिल्हा परिषद
सदस्य दिलीप सार्वे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि पीडित राखडे कुटुंबाला धीर दिला. यावेळी उपसरपंच पवन खवास, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिवराज सिंगाडे, माजी उपसरपंच प्रेमलाल तुमसरे, मंगेश मानपुरे, सुधाकर सिंगाडे, नितेश पाटील, रवी पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "परसवाडा ( दे.) येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट."
एक टिप्पणी भेजें